मुंबई, ठाणे व नवी मुंबईसारख्या ठिकाणी घरांना प्रचंड मागणी असली तरी महानगरात तशी परिस्थिती नाही. मुंबई महानगरात विक्री न झालेल्या घरांची संख्या ३ लाख ४० हजार इतकी झाली आहे. येत्या वर्षअखेरीस या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- मुंबईः मालकाचे ९० लाखांचे सोने चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक
लायझेस फोरास या रिएल इस्टेटमधील घडामोडींशी संबंधित संशोधन कंपनीने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंतची ही आकडेवारी आहे. यापैकी विक्री न झालेली एक तृतियांश म्हणजे एक लाखांच्या आसपास घरे मुंबईत आहेत. त्या खालोखाल ठाणे, पनवेल, नवी मुंबई या शहरांचा क्रमांक लागतो. मुंबईत विक्री न झालेल्या घरांपैकी ३० टक्के घरे १ कोटीपेक्षा कमी तर ७० टक्के घरे २ कोटींपर्यंत आहेत. विक्री न झालेल्या घरांपैकी ७५ टक्के घरे टूबीएचके आहेत.
हेही वाचा- मुंबईतील प्राइम लोकेशनवरील इमारत शिंदे सरकार १६०० कोटींना विकत घेण्याच्या तयारीत?; जाणून घ्या नेमकं प्रकरण
गेल्या वेळी हा आकडा तीन लाखांच्या घरात होता. त्यात वाढ झाल्याचो दिसून येत आहे. राज्य शासनाने चटईक्षेत्रफळाच्या शुल्कात सवलत दिल्याने विकासकांनी अनेक नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत विक्री न केलेल्या घरांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरे उपलब्ध होण्याची संख्या एकीकडे वाढत असली तरी त्यांना प्रतिसाद कमी असल्याचे म्हटले जात असले तरी नाईट फ्रॅंकच्या अहवालानुसार, ॲाक्टोबर २०२२ अखेर मुंबईतील घरविक्रीने १ लाखांचा आकडा गाठला आहे. दहा महिन्यातच हा आकडा गाठला जाणे म्हणजे घरविक्री वाढल्याचे द्योतक असल्याचेही नाईट फ्रॅंकने आपल्या अहवालात म्हटले आहे. करोनाच्या काळात २०२०मध्ये घरविक्रीने उच्चांक गाठला होता. तेव्हढी घरविक्री यंदा झाली नसली तरी गेल्या दहा वर्षांतील हा दुसरा उच्चांक असल्याचेही यात नमूद केले आहे .
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihQFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbXVtYmFpL3RocmVlLWxha2gtZm9ydHktdGhvdXNhbmQtaG91c2VzLXdlcmUtbm90LXNvbGQtaW4tbXVtYmFpLW1ldHJvcG9saXMtbXVtYmFpLXByaW50LW5ld3MtZHBqLTkxLTMyMzg2OTQv0gEA?oc=5