मुंबई बातम्या

ओमायक्रॉनच्या नव्या प्रकाराचा धोका; दिवाळीत अशी घ्या काळजी, मुंबई महापालिकेचे आवाहन – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत करोना नियंत्रणात आला असला तरीही दिवाळीनिमित्त उसळणारी गर्दी लक्षात घेत मुंबई महापालिकेने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्याचप्रमाणे, गेल्या दोन आठवड्यांत मुंबईत करोनारुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात झालेल्या वाढीचीही पार्श्वभूमी त्यास लाभली आहे. मुंबईकरांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी करोना नियमांचे पालन करतानाच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावेत, असे आवाहनही केले आहे.

करोनाचा प्रादूर्भाव संपुष्टात आला असला तरीही गेल्या आठ ते दहा दिवसांत मुंबईतील करोनारुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. राज्य सरकारनेही ओमायक्रॉनच्या नव्या प्रकाराचा प्रादूर्भाव अधिक असल्याचे नमूद केले आहे. तसेच, दिवाळीनिमित्त बाजारपेठांसह अन्यत्र होणारी गर्दी लक्षात घेत पालिकेने नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

सणासुदीच्या कालावधीत करोना नियमांकडे होणारे दुर्लक्ष, बंदिस्त आणि हवेशीर नसणाऱ्या जागांमध्ये होणारी गर्दी आदी घटक करोनाच्या रुग्णसंख्येत वाढीसाठी कारणीभूत ठरण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबईकरांनी दिवाळीच्या अनुषंगाने करोना नियमांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

याचे पालन करा

– सणासुदीत करोना प्रतिबंधक नियमांचे पालन.

– लक्षणे असलेल्या रुग्णांबरोबर निकटचा संपर्क टाळावा.

– वारंवार हात धुणे. खोकताना, शिंकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू पेपर वापरा.

– करोना लस घेतली नसल्यास तातडीने लसीकरण करावे.

– रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास वा तसा धोका जाणवल्यास बूस्टर लस घेणे.

– बंद खोल्यांमध्ये संसर्गाचे विषाणू पसरण्याची शक्यता अधिक असल्याने घरात हवा खेळती राहण्याची काळजी घ्यावी.

– करोना लक्षणे आढळल्यास चाचणी करावी. त्याचा अहवाल येईपर्यंत स्वत:स इतरांपासून वेगळे ठेवावे.

– करोनाची लागण झाल्याचे समजताच उपचार घ्यावे वा रुग्णालयात दाखल व्हावे.

– ज्या व्यक्तींना इतर आजार आहेत किंवा करोनाचा प्रसार असलेल्या देशांमध्ये भेट दिली असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/omicron-subvariant-bmc-appeal-citizens-to-take-precautions/articleshow/94953616.cms