म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना मुंबईत लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप पुण्यात लोकल सेवा सुरू करण्याबाबत रेल्वेला कोणतेही ‘सिग्नल’ देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रेल्वे आणि राज्य सरकारला केवळ मुंबईतील चाकरमान्यांचीच फिकीर असून, पुणेकर प्रवाशांची कोणतीही पर्वा नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी २५ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून पुण्यात सर्वसामान्यांसाठी लोकलची सेवा ‘यार्डा’तच बंद आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. मुंबईत लशीचे दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी केवळ मुंबई लोकलचाच उल्लेख केला. त्यामुळे मुंबई व्यतिरिक्त अन्य शहरांतील प्रवासी संभ्रमात आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या दररोज ४२ फेऱ्या होत होत्या. त्यातून हजारो प्रवासी नोकरी, शिक्षण आणि विविध कारणांनी ये-जा करीत होते. मात्र, त्या प्रवाशांची आता मोठी गैरसोय होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी लोकल सेवेबाबतचा संभ्रम दूर करून, मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा आणि दौंड-पुणे-दौंड रेल्वे प्रवासी संघाचे सरचिटणीस विकास देशपांडे यांनी केली आहे.
‘पीएमपी’च्याही फेऱ्या कमीच
‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) बस फेऱ्या पूर्वीच्या तुलनेत कमीच आहेत. त्यामुळे निगडीहून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची अधिक गैरसोय होत आहे. या मार्गावरील प्रवाशांना वर्षभरापूर्वी ‘पीएमपी’सह लोकलचाही पर्याय उपलब्ध होता. मात्र, आता तो पर्यायही उपलब्ध नाही.
सरकारी आदेशाच्या प्रतीक्षेत
मुंबईत लोकल सुरू करण्याबरोबरच पुण्यातही सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिल्यास, पुण्यातही लोकल सुरू करता येईल, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी स्पष्ट केले.
……..
रेल्वे आणि राज्य सरकारकडून पुणेकर प्रवाशांवर अन्याय केला जात आहे. करोनाकाळात अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात लोकल बंद असल्याने प्रवासावर अधिक खर्च करावा लागत आहे.
– हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप
……….
पुणे ते दौंड मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावर डेमू सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य सरकारने तातडीने सेवा सुरू करावी.
– विकास देशपांडे, सचिव, दौंड-पुणे-दौंड रेल्वे प्रवासी संघ
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/after-mumbai-pune-demands-opening-up-of-local-trains/articleshow/85232456.cms