हायलाइट्स:
- मुंबईतील भांडुप इथं बेस्टच्या बसला विचित्र अपघात
- आधी रिक्षाला, नंतर चाळीच्या भिंतीला धडकली बस
- अपघातात एक ठार, दोघे किरकोळ जखमी
मुंबई: भांडुप येथे बेस्टच्या बसला आज झालेल्या भयंकर अपघातात एका ज्येष्ठ नागिरकाचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. (Best Bus Accident In Bhandup, Mumbai)
वाचा: LIVE लोकल पास वाटप; महापौरांनी प्रभादेवी स्थानकावर जाऊन केली पाहणी
भांडुप पश्चिमेकडील अशोक केदार चौकात हा विचित्र अपघात झाला. अपघातग्रस्त बस टेंबीपाड्याहून भांडुप रेल्वे स्थानकाच्या दिशेनं निघाली होती. बस चालकाचं नियंत्रण सुटून ही बस समोरून येणाऱ्या एका रिक्षाला धडकली. रिक्षाला चुकवण्याच्या प्रयत्नात बस नंतर एका चाळीच्या विजेच्या मीटर केबिनला धडकली. त्यात तिघे जखमी झाले. यातील एका ज्येष्ठ नागरिकाला डोक्याला व हाताला मार लागला. वाहतूक पोलिसांनी तात्काळ त्याला मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. पुंडलिक भगत (वय ७०) असं मृताचं नाव आहे.
वाचा:तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही… अजित पवारांचं पंतप्रधानांना मराठीत पत्र
या अपघातात रविंद्र तिवारी (वय ६५) व मुकेश उपाध्याय (वय ४४) हे दोघे जखमी झाले आहेत. या दोघांवरही उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-1-dead-2-injured-in-best-bus-accident-in-bhandup/articleshow/85236386.cms