प्रवीण मुळे, मुंबई
मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील हेरिटेज वॉकला मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे आता पुढील टप्प्यात इतर अनेक पुरातन वारसास्थळांमधील इतिहासही जिवंत होणार आहे. मुंबई विद्यापीठ, पोलिस मुख्यालय, मुंबई उच्च न्यायालय, विधान भवन अशा अनेक वास्तूंमध्ये हेरिटेज वॉक सुरू करण्याचा आराखडा आखण्यास पर्यटन विभागाने सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईच्या हेरिटेज श्रीमंतीचा याचि देही, याचि डोळ अनुभव घेता येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील हेरिटेज वॉकला केवळ मुंबईतूनच नव्हे तर पुणे, नाशिक ते अगदी गुजरातसह इतर अनेक राज्यातूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आठवड्याला साधारण ८ हेरिटेज वॉकचे नियोजन असताना सध्या दर शनिवार, रविवारी या वॉकची संख्या १२पर्यंत जात आहे. इतकेच नव्हे तर महापालिकेच्या या पुरातन वैभवाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील दोन आठवड्यातील वेळापत्रकही हाऊसफुल झाले आहे. या प्रतिसादामुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मुंबईतील अनेक प्रमुख वास्तूंमधील पुरातन कलात्मक खजिना जगासमोर खुला करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. याची सुरुवात मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, विधान भवन, पोलिस मुख्यालयापासून करण्याच्या दृष्टीने आखणी करण्यास सुरुवात झाली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या या हेरिटेज वॉकद्वारे जगाच्या पर्यटन नकाशावर मुंबईची नव्याने ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट टूर सुरू करण्याची घोषणा पर्यटन विभागाने यापूर्वीच केली आहे.
प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज
राज्य सरकारने ज्या वास्तूंचा विचार हेरिटेज वॉकसाठी केला आहे, त्याच्या पुरातन वैभवाविषयी जितके जाणून घ्यावे तितके कमी आहे. महापालिका मुख्यालयाच्या हेरिटेज वॉकला जो उत्तम प्रतिसाद मिळत आहे, तोच या सर्व ठिकाणी मिळेल याविषयी आम्हाला खात्री असल्याचे महापालिका मुख्यालयातील हेरिटेज वॉकची जबाबदारी सांभाळणारे ‘खाकी हेरिटेज फाऊण्डेशन’चे भरत गोठसकर यांनी ‘मटा’ला सांगितले. ‘खाकी हेरिटेज फाऊण्डेशन’तर्फे मुंबईत ६० हेरिटेज वॉकचे आयोजन केले जात आहे. यात येत्या काळात आणखी ३० वॉकची भर पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जीपीओ यापाठोपाठ नेव्हल डॉकयार्ड, पोर्ट ट्रस्ट, जेजे रुग्णालय, जेजे स्कूल ऑफ आर्ट अशा अनेक वास्तूही सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुल्या करता येतील, असे गोठसकर यांचे म्हणणे आहे. पण या सर्व ठिकाणची इत्थ्यंभूत माहिती लोकांपर्यंत नीट देण्यासाठी तितक्याच प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/environment-department-has-prepare-plan-for-start-heritage-walk-in-mumbai-high-court-mumbai-university-police-headquarters/articleshow/81163419.cms