हायलाइट्स:
- विनामास्क फिरणाऱ्यांवर पालिका कारवाई करणार
- मुंबई पोलिसांच्या नावे सोशल मीडियावर फेक न्यूज
- मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं स्पष्टीकरण
मुंबईः राज्यात करोनाचा संसर्गाबरोबरच अफवांही जोर धरु लागल्या आहेत. अलीकडेच महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्याचे खोटे मेसेज व्हायरल झाले होते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या नावे आणखी एक खोटा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरतोय. या व्हायरल मेसेजवर खुद्द मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीच स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे.
पुणे, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनानं कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातही पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. फेक न्यूज व खोटे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इशारा दिला होता. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरीही सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या नावानं काही मेसेज व्हायरल आहेत. यामध्ये मुंबईत जर सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नाही, तर त्यासाठी १ हजार रुपये दंड ठोठावला जाईल, असं म्हटलं आहे. या व्हायरल मेसेजवर मुंबई पोलीस आयुक्तांनीच खुलासा केला आहे.
वाचाः सांगलीत राष्ट्रवादीची सत्ता; काँग्रेसनं केला ‘हा’ मोठा दावा
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक ट्वीट केलं आहे. प्रिय मुंबईकर! आपल्याला फेक न्यूज विकणारे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. यावेळी त्यांनी म्हटलंय की मास्क घातला नाही, तर तुम्हाला १ हजार रुपये दंड केला जाईल. पण तुमच्या सुरक्षेशी झालेली तडजोड कितीही मोठी रक्कम असली, तरी भरून निघणार नाही. पण दंडाची रक्कम म्हणाल, तर मास्क न घातल्याबद्दल तुम्हाला मुंबईत फक्त २०० रुपये दंड ठोठावला जातो, असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः लॉकडाऊनचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; गृहमंत्र्यांनी दिला इशारा
दरम्यान, मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास पालिका आणि पोलिसांनी दंडवसुली सुरू केली आहे. पालिकेने ही कारवाई गेल्या काही दिवसांपासून हाती घेतली आहे. त्याप्रमाणे, रविवारी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या १४,१०० व्यक्तींकडून २८ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल २०२० ते २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १६ लाख दोन हजार ५३६ लोकांवर कारवाई झाली आहे. त्यातून ३२ कोटी ४१ लाख १४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/fakenews-mongers-claiming-that-no-mask-can-cost-you-a-fine-1000-rupees-by-mumbai-police/articleshow/81173692.cms