म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नियंत्रणात आलेला करोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढत चालल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजनांच्या संख्येत वाढ केली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल एक हजारांहून अधिक इमारती सील करण्यात आल्या असून, आता इमारतींमधील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या एक हजार ३०५ वर गेली आहे. बंद केलेली करोना केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली असून, दुसरीकडे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. दररोज २० हजारांहून अधिक चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
लोकलच्या वेळा एक फेब्रुवारीपासून वाढवण्यात आल्यानंतर १० फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारीत दररोज ३०० पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या सध्या ८००च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सील इमारतींच्या नियमांत सुधारणा करून कठोर अंमलबजावणी केली जाते आहे. सध्या मुंबईत चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये ५७, तर इमारतींमध्ये ३२१ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. इमारत सील करण्याचे नियम पालिकेने बदलले असून, पूर्वी एखाद्या इमारतीत दहा रुग्ण सापडल्यास संपूर्ण इमारत सील केली जात होती. आता पाच रुग्ण सापडले की, इमारत सील केली जात आहे. दोन रुग्ण आढळल्यास संपूर्ण मजला सील करण्याचा नियम कायम आहे. त्यामुळे दोन दिवसांत सील करण्यात आलेल्या इमारतींमध्ये वाढ होऊन ती एक हजार ३००च्या वर गेली आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
३१ कोटींची दंडवसुली
करोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, याकडे अनेक जण दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ४८ हजार मार्शलच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱ्या १३ हजार ५९२ जणांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे २७ लाख १८ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, एप्रिल २०२०पासून आतापर्यंत १५ लाख ५८ हजार ८७ जणांवर अशी कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ३१ कोटी ५२ लाख २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या बातमीने पुणेकर हादरले; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण
बंद केलेली करोना केंद्रे सुरू
अचानक रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यास धावपळ होऊ नये म्हणून प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत एक याप्रमाणे मुंबईत २४ करोना केंद्रे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार आणखी करोना केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाने संबंधित विभागातील सहायक आयुक्तांना दिले आहेत.
इमारतींमध्ये ९० टक्के रुग्ण
मुंबईतील २४ पैकी ११ विभागांमध्ये एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. मुलुंड, कुर्ला, अंधेरी पूर्वमध्ये प्रत्येकी एक आणि मालाडमध्ये एक क्षेत्र आहे. उर्वरित विभागांमध्ये तीन ते दहा क्षेत्रे आहेत. सध्याच्या रुग्णवाढीत ९० टक्के रुग्ण इमारतींमध्ये वाढत आहेत.
करोना: राज्यात आज किंचित रुग्णवाढ; ‘या’ जिल्ह्यातील आकडे चिंता वाढवणारे
रुग्णवाढीमुळे प्रभावी उपाययोजना आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. पाच रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत व दोन रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला किंवा भाग सील करण्यात येत आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
मुंबईत ९५ टक्के नागरिक नियमांचे पालन करतात. मात्र, पाच टक्के लोक बेफिकीरीने वागत आहेत. हे लोक कोण आहेत? करोना रुग्णांत वाढ झाली किंवा संख्या कमी झाली तरी दोन्ही बाजूने ढोल वाजवणारी जमात मुंबईत आहे. ते लोक यामागे आहेत का याचा शोध घेतला पाहिजे.
– किशोरी पेडणेकर, महापौर मुंबई
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-cases-increase-in-mumbai-therefore-bmc-administration-alert-for-prevent-coronavirus/articleshow/81132588.cms