म. टा. प्रतिनिधी, मुंबई
बॉम्बे हायजवळ ‘रोहिणी’ या नौकेला मोठी आग लागली आहे. नौकेच्या इंजिन रूमने पेट घेतला आहे. त्यात तीन खलाशी बेपत्ता असून एक गंभीर जखमी आहे. जखमी खलाशाला ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरने मुंबईत आणले गेले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबईपासून ९२ सागरी मैल अंतरावर ओएनजीसीची बॉम्बे हायअंतर्गत विस्तारित तेलविहीर आहे. या तेलविहिरीजवळ काम करणाऱ्या ‘रोहिणी’ या नौकेला शनिवारी आग लागली. त्यानंतर नौकेतील अधिकाऱ्यांनी तटरक्षक दलाच्या वरळीतील केंद्राकडे मदतीची विनंती केली. त्यावेळी ‘अल्बाट्रॉस’ हे व्यापारी जहाज जवळच होते. त्या जहाजाला तत्काळ घटनास्थळी जाण्याची विनंती तटरक्षक दलाने केली. या जहाजाने दोरखंडाचा उपयोग करीत ‘रोहिणी’ नौकेला तेथून सुरक्षितस्थळी हलवले. याचदरम्यान तटरक्षक दलाने विशेष टेहळणी विमानही रत्नागिरीहून तेथे धाडले. या विमानाने संपूर्ण स्थितीची माहिती घेत वरळीतील केंद्राला कळवली. त्यानुसार या केंद्राने ‘प्रिया’ ही लहान नौका तेथे धाडली. या नौकेने ‘रोहिणी’च्या बाहेरील भागाची आग विशेष ‘कुलिंग’ प्रणालीने शांत केली. त्या मागोमाग ‘आयसीजीएस समर्थ’ ही नौका घटनास्थळी धाडण्यात आली. ‘आयसीजीएस समर्थ’ने ‘प्रिया’ जहाजाच्या समन्वयाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘रोहिणी’च्या संपूर्ण इंजिनरूमने पेट घेतला असून धुरामुळे नौकेतील कर्मचारी हतबल होते. त्यामुळे अखेर ‘आयसीजीएस समर्थ’मधील तटरक्षक सैनिकच भर समुद्रात नौकेवर गेले. ही आग विझविण्यासाठी त्यांचे सायंकाळ उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
‘पर्यावरण रक्षक’ नौकाही रवाना
समुद्री तेल प्रदूषण दूर करण्यासाठी तटरक्षकदलाची विशेष नौका माझगाव येथे सज्ज असते. ही नौकाही तात्काळ प्रदूषणसंबंधी कार्यासाठी घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘पर्यावरण रक्षक’ उपक्रमात या नौकेवर विशेष प्रकाश टाकला होता.
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-3-crew-member-missing-in-engine-room-fire-on-offshore-vessel-at-bombay-high/articleshow/80903885.cms