म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई शहर व उपनगरातील घरविक्रीत जानेवारी महिन्यात ४८ टक्के घट झाली आहे. डिसेंबरच्या तुलनेत दस्तनोंद ९ हजारांहून अधिक कमी झाली आहे. मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते.
करोना संकटामुळे राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात तीन टक्के कपात केली होती. ही कपात ३१ डिसेंबरपर्यंत लागू होती. त्याचवेळी रिअल इस्टेट क्षेत्राला उभारी देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी विविध सवलती देऊ केल्या होत्या. या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊन डिसेंबर महिन्यात मुंबई शहर व उपनगरात विक्रमी १९ हजार ५८० दस्तनोंद झाली होती. आता जानेवारी महिन्यात मात्र यामध्ये चांगलीच घट झाली.१ जानेवारीपासून मुद्रांक शुल्कात १ टक्का वाढ झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवरील तीन टक्के कपात २ टक्क्यांवर आली. त्यामुळे जानेवारी महिन्यात फक्त १० हजार ४१२ दस्तनोंदी, अर्थात तेवढ्या घरांचीच विक्री झाल्याचे येथील मुद्रांक शुल्क अतिरिक्त महानिरीक्षक कार्यालयाच्या माहितीतून समोर आले आहे.
६८० कोटींवरुन ३०५ वर
डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीतील घरांची खरेदी-विक्री ९१६८ ने कमी झाली. मुद्रांक शुल्काचा विचार केल्यास डिसेंबरमधील विक्रमी दस्त नोंदणीद्वारे ६८० कोटी रुपये शुल्क गोळा झाले होते. जानेवारी महिन्यात हा आकडा ३०५ कोटी रुपयांवर आला. अर्थात त्यात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली. हाच आकडा मागील वर्षी जानेवारी महिन्यात ४५४ कोटी रुपये होता.
महिना… दस्त नोंद…. मुद्रांक शुल्क (कोटी रुपयांत)
जानेवारी २०२०… ६१५०…. ४५४ कोटी ०५ लाख
डिसेंबर २०२०… १९,५८०…. ६८० कोटी ५० लाख
जानेवारी २०२१… १०,४१२…. ३०५ कोटी ११ लाख
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/home-sales-declined-by-47-percent-in-mumbai/articleshow/80680529.cms