या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
- Share this:
रत्नागिरी, 16 जानेवारी : मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटातील अवघड वळणावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
भोस्ते घाटात मारुती वॅगनार आणि ऑटो रिक्षामध्ये समोर समोर धडक झाली. यामुळे झालेल्या अपघातात रिक्षामधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, एमएच 03 बीटी. 4304 ही रिक्षा प्रवासी घेऊन चिपळूण ते खेडच्या दिशेने येत होती. मात्र मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाच्या अवघड वळणावर अली असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती वॅगनार कारने विरुद्ध दिशेला जाऊन रिक्षाला धडक दिली. या अपघातात प्रवासी जखमी झाले असून रिक्षाचे आणि वॅगनार कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर खेड पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याला सुरुवात केली.
दरम्यान, गेल्या काही काळापासून मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वेगावर नियंत्रण राहात नसल्यानेच यातील बहुतांश घटना घडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे वाहनचालकांनी महामार्गावर वाहन चालवता नियंत्रित वेग आणि इतर नियमांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
Source: https://lokmat.news18.com/maharashtra/chiplun-accident-on-mumbai-goa-highway-2-injured-latest-updates-mhas-514080.html