श्रीरंग खरे <<[email protected]>>
हिंदुस्थानात पॉप बँड आणि म्युझिक अल्बमचं वेड थोड्या उशिराने पसरत गेलं होतं. 90 च्या दशकातील या गाण्यांचा मी भयंकर मोठा फॅन आहे. ही गाणी लक्षात राहिली ती त्यांच्या वेगळेपणामुळे. या गाण्यांमध्ये गायक दिसत त्यामुळे त्यांना ओळखणं सोपं झालं होतं. दूरदर्शनवर क्वचित ही गाणी दिसायची. मात्र ‘एम टीव्ही’ आणि ‘चॅनल व्ही’ आल्यानंतर या गाण्यांची संख्या प्रचंड वाढली होती.
ABBA – जग जिंकलं, एकमेकांशी लग्न केलं! मात्र या परीकथेच्या अंतासोबत बँडचाही अंत झाला
चित्रहार वगैरे सारखे गाण्यांचे कार्यक्रम दूरदर्शनवर सुरू होते, मात्र तरुणांना त्यात फार रस नव्हता, कारण त्यात तुलनेने जुनी गाणी दाखवली जात होती. म्युझिक अल्बम प्रसिद्ध होण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे वॉकमन, रेडियो आणि नंतर सीडी प्लेअरचा बाजारातील उदय. खासगी टीव्ही आणि रेडियो चॅनल सुरू झाल्यानंतर नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगळा कंटेट देणं गरजेचं होतं. म्युझिक अल्बम पॉप बँड यांनी हा कंटेट आधीपासूनच निर्माण करायला सुरुवात केली होती.
व्हायकिंग झाले बॉम्बे व्हायकिंग
बॉम्बे व्हायकिंग्जने हिंग्लिश गाण्यांचा प्रकार रुजवण्याचा प्रयत्न केला, ज्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. जर त्यांची गाणी ऐकली तर ती जुनी हिंदी गाणी, त्यात रॅपरचे इंग्लिश शब्द असं फ्युजन करून सादर केली गेली होती. बॉम्बे व्हायकिंग्ज हा बँड खऱ्या अर्थाने नीरज श्रीधरचा होता. नीरज हा हिंदुस्थानी असला तरी त्याचं कुटुंब स्वीडनमध्ये स्थायिक झालेलं होतं. लहानपणापासून गाण्यांची आवड असलेल्या नीरजने वयाच्या 17 व्या वर्षी गाणी गायला सुरुवात केली होती. स्वीडनमध्येच त्याने बँड सुरू केला होता ज्याचं नाव त्याने व्हायकिंग ठेवलं होतं. मात्र त्याच नावाचा दुसरा एक बँड असल्याने त्याने बँडच्या नावात ‘बॉम्बे’ सामील केलं आणि त्याद्वारे गायला सुरूवात केली. त्याच्यासोबत त्याचे 7 साथीदार होते, ज्यामध्ये ऑस्कर सोडेनबर्ग, मॅट नोरडेनबर्ग, पार, मॅटस फोल्क, मॉर्गन, स्टँफ्फन, जोहान फोल्क यांचा समावेश होता.
फक्त 2-3 हिंदी शब्द असलेली गाणी
नीरज हिंदुस्थानात आल्यानंतर त्याने कालांतराने त्याच्या इतर साथीदारांनाही बोलावून घेतलं होतं. या सगळ्यांनी मिळून ‘क्या सूरत है’ हे गाणं तयार केलं होतं. किशोर कुमार यांच्या ‘ जरुरत है, जरूरत है…सख्त जरुरत है’ या गाण्याच्या चालीवर बॉम्बे व्हायकिंग्जने ‘क्या सूरत है’ तयार केलं होतं. या गाण्यात भरपूर इंग्रजी शब्द होते. गाणं इंग्रजाळलेलं असल्याने ते घ्यायला कोणी तयार नव्हतं.
रासपुतीन ज्या दिवशी, ज्या ठिकाणी मेला, त्याच दिवशी-तिथेच बॉबी फारेलचा मृत्यू झाला
अखेर सोनी म्युझिकने हे गाणं घेण्यास होकार दर्शवला. इथून इंग्रजी शब्द ठासून भरलेली हिंदी गाणी चलनात यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या गाण्यामध्ये ‘क्या सूरत है’ इतकेच शब्द हिंदी होते बाकी सगळं गाणी इंग्रजीत होतं. गाणं लिहिणं, त्याला चाल लावणं (भले ती उसनी घेतलेली होती) आणि गाणं हे काम नीरज श्रीधरनेच केलं होतं. हे गाणं तुफान प्रसिद्ध होण्यामागे एक कारण होतं ते म्हणजे याचा व्हिडीओ. व्हिडीओत दिसणारी चित्रविचित्र लोकं, रंगीबेरंगी कलर टोन, फिस्ट आयस्क्रीमची जाहिरात, देखणी मालिनी शर्मा आणि तिचा पाठलाग करणारा राजू सुंदरम यांची भट्टी जबरदस्त जमली होती. राजू सुंदरम हा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभू देवा याचा भाऊ होता, या गोष्टीचाही गाण्याच्या आणि अल्बमच्या प्रसिद्धीला फायदा झाला होता. हे गाणं बघायला आजही मजा येते.
व्हिडीओ अल्बमनी बँडच्या प्रसिद्धीस मदत केली
याच अल्बममधलं दुसरं गाणं होतं ते म्हणजे ‘मोना’. हे गाणंही तुफान गाजलं होतं. आर.डी.बर्मन यांनी तयार केलेल्या आणि आशाताई भोसले यांनी गायलेल्या ‘ओ मेरे सोना रे सोना’ या गाण्याची चाल वापरून बॉम्बे व्हायकिंग्जने हे गाणं तयार केलं होतं. यश टोंक, व्रजेश हिरजी, अतुल परचुरे आणि नम्रता बारूआह लिफ्टमध्ये असतात आणि तिघांनाही बघताच क्षणी नम्रता आवडते. तिघांमधले संवाद हे डायलॉग बॉक्समध्ये दाखवण्यात आले असून ते मजेशीर आहेत. या गाण्यातही हिंदी शब्द अपवादानेच सापडत होते. तरीही हे गाणं गाजलं होतं आणि आजही अनेक जण हे गाणं आवर्जून ऐकतात. याचा व्हिडीओ देखील युट्युबला आहे. या गाण्यामध्ये नीरज श्रीधरसोबत ऑस्कर सोडेनबर्गही दिसला होता. व्हिडीओमध्ये गायक दाखवण्याचा ट्रेंड त्याकाळी बराच गाजत होता. नीरज श्रीधरने सांगितलं की ‘त्या काळामध्ये मी बॉलीवूड कलाकारांपेक्षा जास्त प्रसिद्ध होतो. एकदा विमानतळावर त्याला बॉम्बे व्हायकिंग म्हणून लोकांनी हाका मारल्या होत्या. त्यावेळी मी त्यांना भेटलो आणि माझं खरं नाव हे नीरज श्रीधर आहे’. यावरून या बँडची प्रसिद्धी लक्षात येऊ शकते.
बँडचं पुढे काय झालं ?
2000 साली आलेला ‘वो चली’, 2002 साली आलेला ‘हवा मे उडता जाये’ हे बॉम्बे व्हायकिग्जचे अल्बम्सही प्रचंड प्रसिद्ध झाले होते. यामध्येही टायटल ट्रॅक हे जुन्या हिंदी गाण्यांची चाल वापरून तयार करण्यात आले होते. याही अल्बममध्ये तकडभडक कपडे, सुंदर मॉडेल्स, आजूबाजूला नाचणाऱ्या तरुणी, आकर्षक सेट यांचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे ही गाणी व्हिडीओसकट लोकांच्या लक्षात राहिली. नीरज श्रीधर हा या बँडचा मुख्य कलाकार होता. बँडचं नंतर काय झालं हे कळू शकलेलं नाही, मात्र नीरज हा पार्श्वगायनाकडे वळला. त्याने यामध्येही बरंच नाव कमावलं. बॉम्बे व्हायकिंग्जचं मला सर्वात आवडलेलं गाणं हे फाल्गुनी पाठक आणि नीरज श्रीधरने म्हटलेलं ‘तेरा मेरा प्यार सनम’ हे आहे. या गाण्यासाठी फाल्गुनी पाठकचा आवाज अप्रतिम लागलेला आहे. या गाण्यासाठी तडकभडक सेट न वापरता ब्लॅक बॅकग्राऊंडवर लाईटच्या फोकसमध्ये सगळं गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. गाण्याच्या दृश्यांमध्ये प्रामुख्याने ब्लॅक अँड व्हाईट रंग ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. रंग या व्हिडीओमध्ये अपवादाने दाखवण्यात आले आहेत.
ब्लॉगवरील प्रतिक्रिया देण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- [email protected]
Source: https://www.saamana.com/bombay-viking-neeraj-shridhar-band-hindi-english-songs/