नागपूर : व्यावसायिक गिरीधर अग्रवाल याने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी कुख्यात गुंड राजू भद्रे याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
अग्रवालने २०१४मध्ये कुख्यात राजू भद्रे व अयूब अमीर खान याच्याविरोधात भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, ३८७, ४५२, ५०६ ब, ४४७, ३७९ आणि १२० ब अन्वये, तसेच आर्म्स अॅक्टच्या कलम ३ आणि २५ अन्वये नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अतिक्रमण काढण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याचा खोटा आरोप अग्रवालने केला असल्याचा दावा भद्रे व खान याने याचिकेत केला होता. याप्रकरणी ११ मार्च २०१४ मध्येच गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच तो गुन्हा रद्द करावा, यासाठी भद्रे व खान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी हायकोर्टाने अंतरिम स्थगिती दिली होती. तसेच तो आदेश नंतर निरंतर कायम राहिला. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना पुढील तपास करता आला नाही. भद्रेच्यावतीने अॅड. उदय डबले, अग्रवाल यांच्यावतीने अॅड. मनोज साबळे तर सरकारतर्फे अॅड. मयुरी देशमुख यांनी बाजू मांडली.
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/bombay-high-court-nagpur-bench-has-refused-gangster-raju-bhadre-petition-for-cancels-the-fir/articleshow/79991051.cms