मुंबईः करोना विषाणू्च्या उद्रेकामुळं २०२० हे वर्ष सगळ्यांसाठीच कठीण गेलं. लॉकडाऊन, आर्थिक समस्या यासर्वांमुळं या वर्षात मध्यमवर्गीयांसह अनेक बड्या व्यक्तींनाही हे वर्ष अडचणींचं गेलं. पण, आता हे वर्ष संपून नवं वर्ष सुरु होणार आहे. नवं वर्ष अगदी धुमधडाक्यात साजरं करण्यासाठी मुंबईकरांनी अनेक प्लानही आखले असतील. मात्र, करोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाहीये, याची जाणीव करुन देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
पाश्चिमात्य देशांत करोना व्हायरसचं स्वरुप बदललं आहे. हा विषाणू करोनापेक्षा अधिक वेगानं पसरू शकेल हीच भीती असताना राज्य सरकारने पालिका क्षेत्रांसाठी रात्रीची संचारबंदी लावली आहे आहे. नववर्षाच्या स्वागताला पार्ट्यांचे आयोजन केलं जात, लोक एकत्र येतात. यातून संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने राज्यात पालिका क्षेत्रांत ५ जानेवारी पर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनीही एक ट्विट करत नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
वाचाः सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर; राऊतांचा भाजपवर ‘हा’ गंभीर आरोप
‘सुरक्षेला सलाम नमस्ते म्हणा, करोनाला नाही. रात्री ११च्या आत पार्टी संपवा आम्हाला व्हॉट्स गोइंग ऑन विचारण्याची संधी देऊ नका,’ असं सूचक ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.
दरम्यान, रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. रात्रपाळीची कार्यालये वगळता पब, हॉटेल्स, सिनेमागृह अशी करमणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या आस्थापना रात्री ११ वाजता बंद करणे बंधनकारक आहे.
वाचाः लॉकडाऊनच्या संकटात ‘या’ मराठी तरुणांनी शोधली संधी
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police-appeal-to-mumbaikar-ahed-new-year-celebration/articleshow/79991774.cms