मुंबई बातम्या

नाताळनिमित्त खूषखबर! मुंबई ते गोवा विनाचाचणी प्रवास करता येणार – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

नाताळच्या निमित्ताने मुंबई ते पणजीसह कोकणातील ५ मार्गांवर एसटीची शयन-आसनी सेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या गाडीतून प्रवाशांना ‘विनाचाचणी’ मुंबई-गोवा-मुंबई असा प्रवास करता येईल. या प्रवासासाठी ऑनलाइन-ऑफलाइन या दोन्ही प्रकारचे आरक्षण महामंडळाने सुरू केले आहे.

महाराष्ट्रलगतच्या राज्यातून संभाव्य करोना संसर्ग रोखण्यासाठी गोवा, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली येथून हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गे महाराष्ट्रात आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. तथापि, एसटीतून प्रवास करताना कोणत्याही करोना चाचणीची गरज नसून तिकीट काढून प्रवाशांना प्रवास करता येईल, असे महामंडळाने स्पष्ट केले. यामुळे सार्वजनिक वाहतुकीत करोना चाचणीच्या भिन्न धोरणांमुळे नवा गोंधळ समोर आला आहे.

मुंबई सेंट्रल-पणजी ही शयन-आसनी बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी आणि म्हापसा मार्गे पणजीला जाईल. ही बस मुंबई सेंट्रल येथून दुपारी ४.३० वाजता आणि पणजी येथून दुपारी ४ वाजता मुंबई सेंट्रलसाठी रवाना होईल. या बस आगाऊ आरक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच एमएसआरटीसी मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. करोना चाचणी करण्याचा विषय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचा असून महामंडळ हे सेवा पुरवणारे साधन आहे, असे ही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी यापूर्वीच विमान-रेल्वे-रस्ते मार्गे मुंबईसह महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्यांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर केली आहे. त्यानुसार चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला. अहवाल नसल्यास रेल्वे स्थानक तसेच विमानतळावर १२०० ते १४०० रुपये भरून महापालिकेकडून प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येते. मात्र या ठिकाणी रक्कम वसूल करणारे कर्मचारी संसर्ग रोखणाऱ्या नियमांचे पालन करत नाही. लांबलचक रांगेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो, असा आरोप अनेक विमान प्रवाशांनी केला आहे.

एसटी शयन-आसनी गाड्यांचे तिकिट दर

मुंबई सेंट्रल-पणजी – ९६५ रुपये
मुंबई सेंट्रल-म्हापसा – ९५० रुपये
मुंबई सेंट्रल-बांदा – ८९५ रुपये
मुंबई सेंट्रल-सावंतवाडी – ८७५ रुपये
मुंबई सेंट्रल-कणकवली – ७८५ रुपये

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/st-corporation-has-decided-to-start-bus-service-on-5-routes-in-konkan-including-mumbai-to-panaji-due-to-christmas-festival/articleshow/79654362.cms