नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई : दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी अशा पारबंदर प्रकल्पाचे (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड – एमटीएचएल) ३५ टक्के काम पूर्ण झाले असून ठरलेल्या वेळेत म्हणजे सप्टेंबर २०२२ पर्यंत तो पूर्ण होईल. नगर विकासमंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी या प्रकल्पाचा पाहणी दौरा करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची ग्वाही दिली.
अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेला हा २२ किमीचा प्रकल्प मार्च २०१८ मध्ये मार्गी लागला आहे. सध्या या प्रकल्पावर अभियंते, कुशल/अकुशल कामगार असे सुमारे सहा हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. ‘टाळेबंदीच्या काळात कामावर झालेल्या परिणामामुळे प्रकल्पास विलंब होईल अशी शक्यता वाटत होती, मात्र कामाचे तास वाढवले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जात आहे. त्यामुळे प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकतो,’ असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.
स्टील गर्डरचा देशात प्रथमच वापर
पुलाखालून बोटींची वाहतूक सुकर होणे आणि समुद्रातील तेलवाहिन्यांना धक्का लागू नये यासाठी खांबामध्ये अधिक अंतर ठेवणे गरजेचे असते. त्या ठिकाणी अत्याधुनिक ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक्सचा (ओएसडी) वापर करण्यात येत आहे.
एकूण २२ किमी पुलापैकी ४.१ किमीचा टप्पा स्टील बॉक्स गर्डरचा असेल. ९० ते १८० मीटर लांबीचे २९ ओएसडी वापरले जातील. या स्टीलबांधणीचा खर्च सुमारे चार हजार ३०० कोटी आहे.
होणार काय?
’ हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर गाठताना ४० मिनिटांची बचत होईल. मात्र या मार्गावर पथकर आकारला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका अंदाजानुसार सुमारे २०० रुपये पथकर आकारला जाऊ शकतो.
’ एमटीएचएलला शिवडीकडील बाजूस वरळी-शिवडी उन्नत मार्ग, पूर्व मुक्त मार्ग या दोन्ही ठिकाणी तर नवी मुंबई येथे विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरशी थेट जोडणी असेल.
’ जेएनपीटी, राज्य महामार्ग ५४, मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग, नवी मुंबई विमानतळ या दिशेने प्रवास सुकर होईल, असे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा चिर्ले येथून आठ किमीवर आहे.
महानगर प्रदेशात दहा वर्षांत सिग्नलविरहित रिंगरूट
मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या सुमारे नऊ विविध वाहतूक प्रकल्प पूर्ण झाल्यावर या परिसरात सिग्नलविरहित ‘रिंगरूट’ अस्तित्वात येऊ शकतो, असे आर. ए. राजीव यांनी सांगितले. वरळी-शिवडी उन्नत मार्ग, एमटीएचएल, विरार अलिबाग मल्टी मोडल कॉरिडॉर, प्रस्तावित वसई-मीरा भाईंदर उन्नत मार्ग, प्रस्तावित वर्सोवा- मीरा भाईंदर सागरी सेतू, सध्या काम सुरू असलेला वांद्रे-वर्सोवा सेतू, वांद्रे-वरळी सागरी, सागरी किनारा मार्ग आणि पूर्व मुक्त मार्ग या सर्व प्रकल्पांत एकमेकास जोडणी आहे. उदाहरणार्थ शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प वांद्रे-वरळी सागरी मार्ग, शिवडी-चिर्ले ट्रान्स हार्बर मार्ग या प्रकल्पांना जोडला जाईल. त्यामुळे दहा वर्षांत हा सिग्नलविरहित रिंगरूट होऊ शकतो.
वैशिष्टय़े
’ पाण्यावरील आणि समुद्रावरील देशातील सर्वात लांब पूल
’ एकूण लांबी २२ किमी
’ ३ + ३ मार्गिका, दोन्ही बाजूस एक आपत्कालीन मार्गिका.
’ सर्वात उंच खांब २६ मीटर
’ समुद्रात सर्वात खोल पाया ४७ मीटर
’ १०० वर्षांची क्षमता.
’ फ्लेमिंगो असलेल्या ८.५ किमी पट्टय़ात ध्वनिरोधक
’ संवेदनशील क्षेत्रात दृश्यरोधक
’ प्रकल्प खर्च – १७ हजार ८४३ कोटी
’ हावडा पुलाच्या तिप्पट स्टीलचा वापर.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 5, 2020 2:48 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/umbai-port-project-completed-in-september-2022-zws-70-2346123/