म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
पीएम केअर फंडला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली होती. त्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आता कायदेशीर तरतुदींवर आधारीतच युक्तीवाद करावा, असा आदेश न्याायालयाने दिला आहे.
अॅड. अरविंद वाघमारे यांनी ही फेरविचार याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यापूर्वी खंडपीठाने पीएम केअर फंडला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती. पीएम केअर फंड पब्लिक ट्रस्ट असल्याने त्याबाबत थेट हस्तक्षेप करता येणार नाही, धर्मदाय आयुक्तांकडे दाद मागावी, या फंडवर विश्वस्थ कोण नियुक्त करावेत, त्याबाबत थेट निर्देश देता येणार नाहीत, असे न्यायालयाने निकालात नमूद केले होते. परंतु, या निकालाचा न्यायालयाने फेरविचार करावा, अशी विनंती आताच्या याचिकेत करण्यात आली आहे. तेव्हा सात डिसेंबर रोजी याचिकेवर सुनावणी निश्चित करण्यात आली.
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/bombay-high-court-nagpur-bench-refused-petition-over-pm-care-fund/articleshow/79375008.cms