मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामींची अंतरिम जामीन याचिका फेटाळली&
थोडं पण कामाचं
- अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
- अर्णब गोस्वामी यांनी अलिबाग सत्र न्यायालयात दाखल केली होती जामीन याचिका
- अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक
मुंबई: आत्महत्या प्रकरणात तुरूंगात असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने आपला निर्णय दिला आहे. अर्नब गोस्वामी यांना अंतरिम जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जामिनासाठी खालच्या न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. खंडपीठाने असं म्हटलं आहे की, अशा परिस्थितीत उच्च न्यायालयाने असाधारण कार्यक्षेत्र वापरण्याचे कोणतेही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही. कोर्टाने पुढे असंही म्हटलं की, गोस्वामी यांच्याकडे कायद्यांतर्गत दिलासा मिळविण्याचा मार्ग आहे आणि ते संबंधित सत्र न्यायालयात जामीन घेऊ शकतात. अंतरिम जामीन अर्जावर हायकोर्टाने आपला निर्णय शनिवारी राखून ठेवताना म्हटलं होतं की, ‘कोर्टात हा खटला प्रलंबित ठेवण्याचा अर्थ असा नाही की, आरोपी सत्र न्यायालयात जामीन मागू शकत नाहीत.’
सोमवारी रायगड जिल्ह्यातील अलिबाग सत्र न्यायालयातही गोस्वामी यांनी जामीन याचिका दाखल केली. सत्र न्यायालय सध्या दंडाधिकारी कोर्टाच्या निर्णयाच्या पुनरावलोकन याचिकेवर सुनावणी करत आहे. याचिकेत अलिबाग पोलिसांनी गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना पोलीस कोठडीत न पाठविता न्यायालयीन कोठडीत पाठविण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. गोस्वामी यांचे वकील गौरव पारकर म्हणाले की, ‘आज सकाळी आम्ही सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.’
अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपी फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्या कंपनीने थकबाकी न भरल्यामुळे २०१८ मध्ये इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्याच्या आईच्या आत्महत्येच्या प्रकरणात ४ नोव्हेंबरला अलिबाग पोलिसांनी अटक केली होती.
बातमीची भावकी
गोस्वामी यांना सुरुवातीला एका स्थानिक शाळेत ठेवले होते. जे अलिबाग तुरूंगातील तात्पुरते कोविड-१९ केंद्र म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत मोबाइल फोन वापरत असल्याच्या आरोपाखाली गोस्वामीला रायगड जिल्ह्यातील तळोजा तुरूंगात पाठविण्यात आले होते. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याला अलिबाग कोर्टात हजर केले. तेथून १८ नोव्हेंबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/bombay-high-court-rejects-arnab-goswamis-interim-bail-plea/320927