मुंबई: मुंबईत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवण्यात येत असून पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर सध्या हजारो कर्मचारी या लोकलमधून प्रवास करत आहेत. यात आता सहकारी आणि खासगी बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. ( Mumbai Local Train Latest Updates )
वाचा: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेने घेतला ‘हा’ निर्णय
राज्य सरकारच्या विनंतीवरून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. मागणीनुसार या लोकलची संख्याही सातत्याने वाढवण्यात येत आहे. या लोकलमधून अत्यावश्यक सेवांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. हे कर्मचारी कोणकोणत्या आस्थापनांतील असतील, हेसुद्धा सरकारनेच निश्चित केले आहे. यात सर्व रुग्णालयांसह सरकारच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासूनच स्थान देण्यात आलं आहे. आता निर्बंध हळूहळू शिथील होत असताना इतर महत्त्वाच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही टप्प्याटप्प्याने लोकलची दारे उघडण्यात येत आहेत.
वाचा: सविनय कायदेभंग!; मनसेचा ‘विना परवानगी, विना तिकीट’ सोमवारी लोकलमधून प्रवास
सरकारने आता सर्व सहकारी आणि खासगी बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारने मंजूर केल्याप्रमाणे या बँकांमधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के कर्मचाऱ्यांना विशेष लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हे कर्मचारी लोकलने मुंबई उपनगरीय नेटवर्कमध्ये प्रवास करू शकणार आहेत. राज्य सरकारच्या विनंतीवरून तसेच रेल्वे मंत्रालय व केंद्र सरकारच्या परवानगीनंतर ही मुभा देण्यात येत असल्याचे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या संयुक्त पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. या निवडक १० टक्के बँक कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडून स्टेशन प्रवेशासाठी लवकरात लवकर क्यूआर कोड मिळवावा. तोपर्यंत वैध ओळखपत्रासह स्थानकांवर प्रवेश देण्यात येईल. महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील, असेही रेल्वेकडून नमूद करण्यात आले आहे.
वाचा: दहा देशांसाठी विमानसेवा लवकरच
दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसेल. त्यामुळे अन्य कोणीही रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, अशी विनंती पुन्हा एकदा रेल्वेने केली आहे. लोकलबाबत काही अफवा पसरवल्या जात असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रवाशांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने अनिवार्य करण्यात आलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे. प्रवासादरम्यान मास्क वापरावा, असेही नमूद करण्यात आले आहे.
वाचा: सोमवारपासून एसटीची महिला विशेष
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/10-percent-staff-of-cooperative-and-private-banks-allowed-to-travel-by-special-local-trains/articleshow/78207399.cms