गतविजेता मुंबई इंडियन्स १९ सप्टेंबरपासून अबुधाबीमध्ये होत सुरु असलेल्या यंदाच्या आयपीएल हंगामाच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध भिडणार आहे. गेल्या वर्षीच्या थरारक अंतिम सामन्यात चेन्नईचा १ धावाने पराभव झाला होता. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० ला, तर स्थानिक वेळेनुसार ६ ला सुरू होईल.
मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने यूएईमध्ये होत असलेल्या आयपीएल हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलं. फक्त साखळी सामन्यांचं वेळापत्रक सुरुवातीला जाहीर करण्यात आलं. प्लेऑफ आणि Dream11 IPL 2020 Final सामन्याचं वेळापत्रक नंतर जाहीर केलं जाईल, असं कौन्सिलने म्हटलं होतं.
आयपीएल सुरू होण्याच्या अगोदरच चेन्नई संघात करोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यातील दोन संघांनी पुढील हंगामाच्या सलामीच्या सामन्यात खेळण्याची परंपरा मोडित निघेल, अशी चर्चा होती. मुंबई आणि चेन्नई हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असून दोन्ही संघांनी मिळून आतापर्यंत सात वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे, ज्यात मुंबई ४ वेळा आणि चेन्नईने ३ वेळा विजेतेपद मिळवलं.
मुंबई आणि चेन्नई आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघ आहेत. या दोन्ही संघातील आतापर्यंतच्या २८ सामन्यांपैकी मुंबईने १७ जिंकले आहेत, तर चेन्नईला फक्त ११ संघांमध्येच विजय मिळवता आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील मुंबई याच कारणामुळे धोनीच्या चेन्नईविरुद्ध भारी पडते. गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईचा फक्त १ धावाने पराभव केला होता.
आयपीएलमधील इतर दोन स्थळं दुबई आणि शारजावर त्यांचा पहिला सामना अनुक्रमे २० आणि २२ सप्टेंबरला होईल. २४ सामने दुबई, २० अबुधाबी आणि १२ सामने शारजाहवर होणार आहेत.
Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/mumbai-indians-to-face-chennai-super-kings-in-opener/articleshow/78185622.cms