श्री गणेश चतुर्थी निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी पर्यंत रेल्वेने खास रेल्वे सेवा सुरू केली होती ती येत्या पाच सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे तसेच रेल्वेमार्गावरील पेडणे येथील बोगद्याची दुरुस्ती येत्या दि.१० सप्टेंबर पर्यंत होईल आणि रेल्वेचा मार्ग पुढे सुरळीत होईल. अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च च्या शेवटच्या आठवडय़ात कोकण रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती,मात्र मालवाहतुकीच्या काही रेल्वे गाडय़ा सुरु होत्या.श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोकण रेल्वे, मध्ये रेल्वेने सावंतवाडी पर्यंत खास रेल्वे गाडय़ा सोडल्या होत्या त्या येत्या दि. ५ सप्टेंबर पर्यंत सुरू राहतील, चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाला गर्दी करण्यास सुरुवात केली असून पाच आणि सात दिवसांचे गणपती विसर्जनानंतर चाकरमानी पुन्हा मुंबई ठाणे भागात परतत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे येथील बोगद्यमध्ये दरड कोसळल्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा बंद झाल्या आहेत आता येत्या दि.१० सप्टेंबर पर्यंत बोगदा दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत होईल असा रेल्वे अधिकाऱ्यांना विश्वास आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या दि.५ सप्टेंबर नंतर सावंतवाडी पर्यंतच्या रेल्वेगाडय़ा सुरू राहतील किंवा कसे याबद्दल शंका आहे . रेल्वेने पुढील वेळापत्रक,आरक्षण बाबत भुमिका जाहीर केलेली नाही .
दरम्यान,मुंबई ते सावंतवाडी या रेल्वे मार्गावर कायमस्वरूपी रेल्वे गाडय़ा सोडाव्यात .त्या आता बंद करू नयेत अशी मागणी प्रवाशांची आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 31, 2020 12:14 am
Source: https://www.loksatta.com/maharashtra-news/trains-on-mumbai-sawantwadi-railway-line-till-5th-september-abn-97-2262626/