मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. सीबीआय चौकशीत सुशांतची अॅटोप्सी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर शवविच्छेदनाचा रिपोर्ट देण्यास सांगितलं होतं. शनिवारी सीबीआयचं एक पथक कूपर इस्पितळात गेले होते. तिथे त्यांनी डॉक्टरांची चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
अॅटोप्सीच्या अहवालात दिसल्या अनेक त्रुटी
सुशांत प्रकरणात मुंबईत आलेल्या सीबीआय टीमच्या हाती शुक्रवारी दुपारीच सुशांतचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट शुक्रवारी दुपारीच मिळाला होता. यानंतर शनिवारी एक टीम कूपर इस्पितळात पोहोचली. सुशांतच्या अटोप्सीचे रिपोर्ट तयार करणाऱ्या पाच डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. यावेळी अॅटोप्सी रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी असल्याचं दिसून आलं.
मुंबई पोलिसांच्या आदेशावरच लवकर केलं शवविच्छेदन
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, जेव्हा सीबीआयच्या पथकाने डॉक्टरांना सुशांतच्या अॅटोप्सीचा रिपोर्ट देण्यात एवढी घाई का केली असा प्रश्न विचारला असता त्यातील एका डॉक्टरांनी मुंबई पोलिसांचं नाव घेतलं. पोलिसांनीच तसे करण्यास सांगितलं असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. १४ जून रोजी सकाळी सुशांतचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेला आढळला, त्यानंतर १४ जूनच्या रात्रीच सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यात आला होता.
रियाच्या शवागारात जाण्यावरून उपस्थित झाले होते प्रश्न
सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येण्यापूर्वी रिया चक्रवर्तीही १५ जूनला रुग्णालयाच्या शवागरात गेली होती. तिथे ती जवळपास ४५ मिनिटं होती. इस्पितळाच्या प्रशासनाने आणि मुंबई पोलिसांनी रियाला शवागरात जायची परवानगी कशी दिली हा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला जात आहे. रिया कुटुंबातली सदस्य नाही, शिवाय हे प्रकरण आत्महत्येचं असताना रियाला कोणी आणि का परवानगी दिली हा प्रश्न विचारला जात आहे.
पोस्टमॉर्टम दरम्यान बहीण-मेहुणा होते उपस्थित
याआधी इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार सुशांतसिंह राजपूतच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करताना त्याची मोठी बहीण मितू सिंह उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं होतं. तिच्या सांगण्यावरून त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आल्याचं म्हटलं गेलं. तसंच अहवालात नमुद केल्याप्रमाणे सुशांतचे मेहुणे ओ.पी. सिंहही पोस्टमॉर्टम दरम्यान उपस्थित असल्याचं नमूद केलं आहे.
Source: https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/sushant-singh-rajput-case-doctors-told-cbi-mumbai-police-asked-them-to-do-autopsy-in-hurry/articleshow/77694102.cms