मुंबई:वांद्रे पश्चिम येथील शेरलो राजन रोड वर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळून झालेल्या विचित्र दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवासी अडकले असण्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ( Mumbai Building Collapse )
वाचा: फोर्ट इमारत दुर्घटना; मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत जाहीर
सोमवारी रात्री ८ वाजून ३८ मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शेरलो राजन रोडवर कल्पना इमारतीसमोर असलेली ही चार मजली रिकामी इमारत शेजारच्या निवासी इमारतीवर कोसळली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दजाचे जवान, ८ फायर वाहनं, २ रेस्क्यू वाहनं, २ जेसीबी, ४ डंपर व ५० मजूर घटनास्थळी दाखल झाले. तिथे सध्या युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून दोन रहिवाशी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून काही रहिवाशी अडकले असण्याची शक्यता असून अग्निशमन दलाच्या जवानांनकडून शोधकार्य सुरू आहे, असे मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त भारती इमारत गेल्या तीन दशकांपासून रिकामीच होती, असे सांगण्यात येत आहे. इमारत नेमकी कोणत्या कारणाने कोसळली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
आमदार शेलार घटनास्थळी
भाजपचे स्थानिक आमदार अॅड. आशिष शेलार दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्यात ते आवश्यक सूचना देत आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत असून रात्रभर शोधकार्य सुरू राहणार असल्याचे ट्विट शेलार यांनी केले आहे.
वाचा: मुंबई: डोंगरीत इमारत कोसळली, १० जणांचा मृत्यू
सात वर्षांत इमारती कोसळून ३०० मृत्यू
मुंबईत सन २०१३ ते २०१९ या सात वर्षांत तब्बल तीन हजार ९४५ इमारती किंवा इमारतींचे भाग कोसळून दुर्घटना झाल्या. त्यात ३०० रहिवाशांना जीव गमवावा लागला, तर एक हजार १४६ जण जखमी झाले आहेत. मागील वर्षभरात ५०हून अधिक रहिवाशांचा अशा दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. मुंबईतील मागील काही वर्षांत इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनांची माहिती माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी महापालिकेकडून घेतली आहे. पालिकेने दिलेल्या उत्तरात दुर्घटना, मृत व जखमींची माहिती देण्यात आली आहे. सन २०१३ ते २०१८ या सहा वर्षांत आग, इमारत कोसळणे किंवा इमारतीचा भाग पडणे, विजेचा धक्का, नाल्यात, समुद्रात वाहून जाणे, बुडणे अशा विविध प्रकारच्या तब्बल ४९ हजार १७९ दुर्घटना मुंबईत घडल्या असून, त्यात ९८७ नागरिकांचा मृत्यू झाला तर तीन हजार ६६ जण जखमी झाले आहेत. सन २०१९ मध्ये सर्वाधिक म्हणजे नऊ हजार ९४३ आपत्कालीन दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये १३७ जणांचा मृत्यू झाला असून, ५७९ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये ३७२ पुरुष, तर २०७ महिलांचा समावेश आहे.
वाचा: मुंबई : एका महिन्यात तीन इमारती कोसळल्या; सरकारने ठेवला रहिवाशांवर ठपका
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/four-storey-building-collapses-in-bandra-rescue-operations-underway/articleshow/77599211.cms