मुंबई बातम्या

Mumbai Rain: मुंबई- ठाण्यासह उपनगरात मुसळधार पाऊस, जाणून घ्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स – Sakal

मुंबईः आज पहाटेपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. गुरुवारी दिवसभरात मुंबई आणि परिसरात किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मात्र बुधवारी रात्री उशिरा ते गुरुवारी सकाळपर्यंत अनेक ठिकाणी दमदार पाऊस कायम होता. 

आज कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिमुसळधार तर मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर, उत्तर मुंबई, कोकण किनार पट्टा भाग तसच दक्षिण मध्य मुंबईत ढगाळ वातावरण, काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पुढच्या २४ तासात पालघर आणि कोकण किनारपट्टीसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

हेही वाचाः कोरोना लॉकडाऊनने केले लहानग्यांचे डोळे केले खराब, एक धक्कादायक आकडेवारी समोर

पहाटेपासून पावसानं मुंबईला झोडपलं आहे. मुंबई-ठाण्यासह अनेक उपनगरांमध्ये वाऱ्यासह पावसानं जोर धरला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बुधवारी दिवसभर सुरूअसलेली पावसाची रिपरिप गुरुवारी सकाळपर्यंत सुरूच होती. गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत मुंबई परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार (६५ ते ११५ मिमी) पावसाची नोंद झाली. त्यानंतर अधून-मधून पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला. पश्चिम उपनगरे, ठाणे, डोंबिवली-कल्याण, मीरा-भाईंदर येथे १० ते २० मिमी, नवी मुंबईत पाच ते १० मिमी तर दक्षिण मुंबईत केवळ पाच मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.

अधिक वाचाः तारापूरातील प्रदुषणाला कारखानेच जबाबदार; हरित लवादापुढे १७ सप्टेंबरला सुनावणी

मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे. महिन्याला सरासरी ५८५.२ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस पडल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. तसंच पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसानं मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. त्यांच्यासाठी NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या.

Mumbai Rain Updates IMD Forecasts heavy rainfall mumbai thane orange alert

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-rain-updates-imd-forecasts-heavy-rainfall-mumbai-thane-orange-alert-333576