मुंबईः गेल्या चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्र राज्य कोरोना व्हायसरचा सामना करत आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक होता. शहराला कोरोनाचा जास्त फटका बसला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पालिकेनं विविध पातळीवर उपाययोजना आखल्या. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील तब्बल ६०० कोटी रुपये खर्च झालेत. महापालिकेनं गेल्या पाच महिन्यांत कोरोनाच्या लढाईसाठी हे पैसे खर्च केलेत. तसंच विशेष म्हणजे मुंबईतील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पालिकांसाठी खाटा उपलब्ध करुन दिल्यात.
२ ऑगस्टला आलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील तब्बल ५९८ कोटी रुपये खर्च झाले होते. कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांसाठी सेवा-सुविधा उभ्या करण्याबरोबरच बेघर, बेरोजगार उपाशीपोटी राहू नयेत यासाठी वितरित करण्यात आलेले अन्नपदार्थ आदींसाठी हे पैसे खर्च झाल्याची माहिती या महिन्याच्या सुरुवातीला समोर आली. आता सद्यपरिस्थितीत मुंबई महापालिकेनं कोरोनाच्या लढाईत आतापर्यंत ६१० कोटी रुपये खर्च केलेत.
असे खर्च झाले ६१० कोटी
- रुग्ण आणि डॉक्टरांच्या जेवणासाठी ७३ कोटी ८६ लाख रुपये
- केंद्रीय खरेदी विभागाच्या माध्यमातून १२४ कोटी ४४ लाख रुपयांची उपकरणे खरेदी
- मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल पद्धतीच्या कामासाठी सहा कोटी ६० लाख
- विशेष आरोग्य अधिकारी ६३ कोटी ८४ लाख
- पालिका वॉर्डातील नियंत्रण कक्ष, सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि बीकेसी, गोरेगाव, दहिसर, मुलुंड, वरळी आणि महालक्ष्मी आदी ठिकाणच्या जम्बो सेंटरसाठी मिळून २५९ कोटी ७१ लाख रुपये खर्च
- पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसाठी ४० कोटी ९५ लाख
- स्पेशालिटी रुग्णालयांसाठी १० कोटी ३० लाख
- उपनगरीय रुग्णालयांसाठी २९ कोटी ३३ लाख रुपये खर्च
- पालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी एक कोटी रुपये खर्च
सुमारे एकूण ६१० कोटी रुपये
या संकटकाळात पालिकेकडून कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमधील सुविधांमध्ये वाढ केली. तसंच औषधांचा साठा, आवश्यक ती उपकरणेही उपलब्ध करण्यात आली. त्याचबरोबर संशयित रुग्णांसाठी मुंबईत ३३८ ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली. १७४ ठिकाणी कोरोना केअर सेंटर २ ची सुविधा पालिकेनं सुरु केली होती. त्यापैकी ६० केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. महालक्ष्मी रेसकोर्स, वरळीचे एनएससीआय मैदान, गोरेगावचे नेस्को, सोमय्या मैदान आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्णांसाठी केंद्रे उभारण्यात आली.
हेही वाचाः निसर्गाचं रौद्ररुप! गेल्या दोन महिन्यांत कोसळली तब्बल ‘इतकी’ हजार झाडं
काही ठिकाणी प्राणवायूची, तर काही ठिकाणी अतिदक्षता विभागासारखी व्यवस्थाही करण्यात आली. आज मुंबई महापालिकेकडे २१ हजार ८३५ खाटा आहेत. अतिदक्षता विभागातील १७७६ खाटा, ऑक्सिजन व्यवस्था असलेल्या ११ हजार २९७ खाटा आणि व्हेंटिलेटर असलेल्या १०८९ खाटा आहेत.
अधिक वाचाः राजकारणातील मोठी बातमी, NCPचे 12 आमदार भाजपमध्ये? मोठ्या नेत्यानं केला खुलासा
मुंबई पालिकेनं बेघर आणि बेरोजगार कामगारांना अन्नपदार्थ पाकिटांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. सुमारे साडेतीन लाख व्यक्तींना दुपारी आणि रात्री जेवणाचा पुरवठा पालिकेकडून करण्यात येत होता. नगरसेवकांच्या मतदारसंघातही अन्नपदार्थ पाकिटे वाटली जात होती. आता बहुसंख्य परप्रांतीय मुंबईतून निघून गेल्यानं नोंद असलेले बेघर, बेरोजगारांनाच अन्न पाकिटांचे वाटप होत आहे.
mumbai municipal corporation expenditure 610 crore corona virus battle
Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-municipal-corporation-expenditure-610-crore-corona-virus-battle-332012