रुग्णसंख्येत घट, प्रभावी उपाययोजनांचा परिणाम
मुंबई / ठाणे : करोना प्रतिबंधक उपायांची कठोर अंमलबजावणी, सर्वेक्षण, तपासणी मोहीम, संक्रमित क्षेत्रांत कडक टाळेबंदी, प्रतिजन चाचण्या आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे त्वरित विलगीकरण यावर भर दिल्याने अतिसंक्रमित उत्तर मुंबईबरोबरच ठाणे शहर, मुंब्रा परिसर, कल्याण पूर्व भाग, उल्हासनगर आणि भिवंडी शहरांमधील रुग्णवाढीच्या प्रमाणात घट होत असल्याचे चित्र आहे.
टाळेबंदी शिथिल केल्यानंतर उत्तर मुंबईतील कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील इमारतींमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती. मात्र मुंबई महापालिकेने रहिवाशांबरोबरच दुकानदार आणि फेरीवाल्यांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांमध्ये उत्तर मुंबईत रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात ३० टक्क्यांनी घट झाली.
ठाणे जिल्हा गेला महिनाभर करोनाच्या कचाटय़ात होता. परंतु, बाधितांच्या संख्येत या महिन्याच्या सुरुवातीपासून घट होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ठाणे शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, मुंब्रा परिसर, तर कल्याण-डोंबिवली शहरांतील कल्याण पूर्व परिसर, उल्हासनगर आणि भिवंडी शहर यांसारख्या संक्रमित भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये करोनाबाधितांचे प्रमाण गेल्या आठवडय़ापासून घटल्याचे दिसत आहे.
ठाण्यात कठोर अंमलबजावणी
ठाणे शहरात गेल्या महिन्यात रुग्णांची संख्या रोज नवे उच्चांक गाठत होती. शहरांमधील दाटीवाटीच्या मानल्या जाणाऱ्या मुंब्रा, वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर या परिसरामध्ये दिवसाला ६० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागांना करोना संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. तसेच या सर्व भागांमध्ये कडक टाळेबंदी लागू करत सर्वेक्षण, प्रतिजन चाचण्या आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या विलगीकरणावर भर दिला होता. उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील संक्रमित क्षेत्रांमधील रुग्णसंख्येत ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच घट होत असल्याचे दिसत आहे. सध्या लोकमान्यनगर भागात दररोज ३० ते ४० नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर वागळे इस्टेट परिसरात दररोज १६ हून कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर करोना सुरुवातीला अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या मुंब्रा परिसरात गेल्या आठवडय़ापासून दररोज १० हूनही कमी रुग्ण आढळत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे शुक्रवारी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात एकही नवा करोना रुग्ण आढळला नसल्याची माहिती ठाणे महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवलीतही नियंत्रण
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात जुलैमध्ये दररोज ४५० हून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र, महापालिका प्रशासनाने शहरातील चाचण्यांची संख्या वाढवल्याने तसेच सर्वेक्षण आणि प्रतिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीपासून शहरात दिवसाला ३५० पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला शहरातील अतिसंक्रमित आणि दाटीवाटीच्या कल्याण पूर्व भागात दिवसाला ९० हून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र, पालिका प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या भागात सर्वेक्षणावर आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्यावर भर दिल्यामुळे रुग्णांच्या प्रमाणत घट दिसत आहे. सध्या या भागात दिवसाला ६० हून कमी रुग्ण आढळत आहेत. तसेच शहरातील कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम, मांडा-टिटवाळा या भागातील रुग्णसंख्येतही काही प्रमाणत घट झाली आहे.
उल्हासनगर, भिवंडीत रुग्णघट
सुरुवातीला उल्हासनगर आणि भिवंडी शहरातील आरोग्यव्यवस्था कोलमडल्या होत्या. रुग्णालयांची आणि चाचण्यांची वानवा असल्याने या शहरातील रुग्णांना ठाणे आणि मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे या दोन्ही महापालिका क्षेत्रांत संसर्गाचे प्रमाण वाढले होते. वाढत्या संसर्गामुळे उल्हानगर महापालिका क्षेत्रात दिवसाला २०० ते २५० आणि भिवंडी महापालिका क्षेत्रात ८० ते ९० रुग्ण आढळत होते. तर ही दोन्ही शहरे दाटीवाटीची असल्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंताही व्यक्त केली जात होती. मात्र, या दोन्ही महापालिकांवर नव्याने नियुक्त झालेल्या प्रशासकीय प्रमुखांनी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर अधिक भर दिला. तसेच शहरांतील करोना चाचण्यांची संख्याही वाढवली. त्यामुळे जुलैच्या अखेरीपासून या दोन्ही शहरांत दररोज आढळणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. सध्या उल्हासनगर शहरात दिवसाला ४० हून कमी रुग्ण आढळत आहेत, तर भिवंडी शहरात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २५ हून कमी झाली आहे.
उत्तर मुंबईतील रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी घट
मुंबईत टाळेबंदी शिथिल केल्यानंतर उत्तर मुंबईतील अनेक नागरिक घराबाहेर पडू लागले. त्यामुळे कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील इमारतींमधील करोनाबाधितांची संख्या वाढू लागली होती. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या भागातील घराघरांत जाऊन रहिवाशांची तपासणी सुरू केली होती. दुकानदार आणि फेरीवाल्यांची तपासणी मोहीमही हाती घेतली. त्याचबरोबर प्रतिबंधित क्षेत्रे आणि टाळेबंद इमारतींवरील निर्बंधांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे की नाही यावरही करडी नजर ठेवण्यात आली. यामुळे करोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश येऊ लागले आहे. आजघडीला या तिन्ही उपनगरांतील बाधितांची संख्या १३ हजार ७९४ वर पोहोचली आहे. यापैकी १० हजार ३०३ जण करोनामुक्त झाले आहेत, तर दोन हजार ८४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या परिसरातील ६४९ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले. येथे एक हजार २४० इमारती टाळेबंद असून ६१ परिसर प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
राज्यात नवा उच्चांक
राज्यातील करोनाबाधितांची संख्या पाच लाखांपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या २४ तासांत १२,८२२ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंतचा हा उच्चांक असून, दहा दिवसांमध्ये राज्यातील रुग्णसंख्या एक लाखाने वाढली आहे. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून ९७व्या दिवशी राज्यात एक लाख रुग्ण झाले होते. यानंतर झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत गेली. १५४व्या दिवशी राज्यातील रुग्णसंख्या पाच लाखांवर गेली. म्हणजेच ५७ दिवसांत राज्यात चार लाख रुग्ण वाढले.
अतिसंक्रमित मुंब्रा भागात शून्य रुग्ण
करोना टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात अतिसंक्रमित मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील मुंब्रा प्रभाग समिती परिसरात शुक्रवारी एकही नवा करोना रुग्ण आढळला नसल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. बाधितांच्या घटत्या संख्येमुळे ठाणे जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण काहीसा कमी झाल्याचे सांगण्यात येते.
देशात ६० हजारांहून अधिक रुग्ण
नवी दिल्ली : देशात शनिवारी, सलग दुसऱ्या दिवशी करोना रुग्णांच्या संख्येत ६० हजारांहून अधिक वाढ झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये ६१ हजार ५३७ नवे रुग्ण नोंदवण्यात आले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांचा आकडा २०,८८,६१२ वर पोहोचला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2020 4:02 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-control-in-mumbai-thane-zws-70-2240882/