कणकवलीत उड्डाणपुलाचा भाग कोसळला&
थोडं पण कामाचं
- मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीत उड्डाणपुलाचा भाग कोसळला
- एस एम हायस्कूलची संरक्षक भिंत कोसळली
- पेडण्यात मुंबई-गोवा महामार्गाचा एक भाग खचला
कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) कणकवली (Kankavli) येथे असलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला (under construction flyover bridge collapse in Kankavli). या पुलाचे काम दोन वर्षांपासून सुरू होते.
उड्डाणपुलाचा छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळचा भाग कोसळला. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र दुर्घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
दुर्घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास झाली. काँक्रीट ओतण्याचे काम सुरू होते. पण स्टील काँक्रीटचा लोड घेऊ शकले नाही आणि दुर्घटना घडली. सुदैवाने दुर्घटनेच्यावेळी परिसरात विशेष वर्दळ नव्हती, त्यामुळे जीवितहानी टळली. सध्या कोरोना संकटामुळे मुंबई-गोवा महामार्गावर नेहमीच्या तुलनेत कमी वर्दळ असते. नेहमीसारखी वर्दळ असताना दुर्घटना झाली असती तर मोठी जीविताहानी होण्याचा धोका होता.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्याआधी उड्डाणपुलाचा भाग कोसळल्यामुळे बांधकामाच्या दर्जावरुन आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. याआधी कणकवलीतील एस एम हायस्कूलची संरक्षक भिंत कोसळली होती. पाठोपाठ ही दुर्घटना घडली.
उड्डाणपुलाचा काही भाग सर्व्हिस रोडवर कोसळला. पुलाचा जो भाग कोसळला त्याचे गर्डर आणि स्लॅबचे काम ४ महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले होते. एस एम हायस्कूल ते गड नदी या पट्ट्यातील प्रवासाचा वेग वाढावा या हेतूने उड्डाणपूल बांधण्यात आला होता. पुलाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल दरम्यानचे काम झाले. काम झाल्यानंतर पुलाचे सपोर्ट काढण्यात आले आणि पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. वाहतूक सुरू होऊन चार महिनेच झाले असताना दुर्घटना घडली.
दुर्घटनेची चौकशी व्हावी तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. झटपट चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत आहे, अशीही तक्रार स्थानिकांनी केली आहे.
कोकणातील पावसाचा विचार करुन बांधकाम करण्याची आवश्यकता
कोकणात पाच हजार मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. अशा पावसात टिकाव धरण्यासाठी तीन मीटरपेक्षा जास्त उंचीचा भराव टाकून वायबिम पिलरच्या आधारे भक्कम उड्डाणपूल आणि पुलाचे जोडरस्ते बांधून काढणे आवश्यक आहे. नुसताच भराव टाकून उपयोग होणार नाही. या कामासाठी अतिवृष्टी असलेल्या भागात काम केलेल्या अनुभवी तज्ज्ञांची आवश्यकता असल्याचे स्थानिक भाजप नेत्यांनी सांगितले. त्यांनी या प्रकरणात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट चर्चा करणार असल्याचेही सांगितले.
बातमीची भावकी
पेडण्यात मार्ग खचला
दोन आठवड्यांपूर्वी पेडण्यात मुंबई-गोवा महामार्गाचा एक भाग खचला. काम सुरू असताना ही घटना घडली. गणेशोत्सव तोंडावर आला आहे. दोन आठवड्यांनी अनेकजण कोकणात तसेच गोव्यात गणेशोत्सवासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांपैकी बहुसंख्य नागरिक मुंबई-गोवा महामार्गाने येणार आहेत. अशा परिस्थितीत रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/sindhudurg-news/article/mumbai-goa-highway-under-construction-flyover-bridge-collapse-in-kankavli/305649