मुंबई : दक्षिण मुंबईसह आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी हिंदमाता परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पाणी साचलं आहे. सखल भाग असल्याने इथे गुडघ्यापर्यंत पाणी साचलं असून रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. तर नरिमन पॉईंट, वरळी, परेल, प्रभादेवी, दादर, सायन परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक परिसरात पाणी साचून वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली होती.
दरम्यान येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस असेल. तसंच पुढील 48 तासात मुंबई, ठाण्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मध्य ते जोरदार पाऊस पडेल. याशिवाय 1 ऑगस्टपासून मुंबई, ठाण्यासह कोकणात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या 24 तासात, मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस. ढगाळ आकाश. पुढच्या 24,48 तासात, मुंबई, ठाणे मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता. पुढच्या 48 तासात मराठवाडा व interiors मध्यम/जोरदार पावसाची शक्यता.
1ऑगस्ट पासून कोकणात जोरदार पाऊस असण्याची शक्यता,मुंबई ठाणे, NM सह.
Will update pic.twitter.com/MbVDrBUDza— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 28, 2020
यासोबतच मुंबईच्या समुद्रात आज संध्याकाळी भरतीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामाना विभागाच्या माहितीनुसार, संध्याकाळी 5.53 वाजता भरतीची वेळ असून यावेळी समुद्रात 3.71 मीटरपर्यंत उंच लाटा उसळू शकतात.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/heavy-rain-in-south-mumbai-water-logging-at-hindmata-area-793791