मुंबई बातम्या

मुंबईत दोन आठवडय़ांत करोना आटोक्यात! – Loksatta

‘आयआयटी मुंबई’च्या प्राध्यापकांचा अहवाल

मुंबई : मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव पुढील दोन आठवडय़ांत नियंत्रणात येईल, असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी एका गणितीय प्रारूपानुसार व्यक्त केला आहे. राज्यात पुढील दोन महिन्यांत संक्रमण नियंत्रित होईल असा अंदाज या प्रारूपानुसार व्यक्त करण्यात आला आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले काही महिने ठप्प झालेले जनजीवन अद्यापही सुरळीत झालेले नाही. राज्यातील रुग्णसंख्या रोज वाढते आहे. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यांत सर्वाधिक संक्रमण झालेल्या मुंबईसाठी मात्र आशादायक वाटावा असा अहवाल आयआयटी मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. भास्करन रमण यांनी दिला आहे. पुढील दोन आठवडय़ांत मुंबईतील संक्रमण नियंत्रणात येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

‘लेविट्स मॅट्रिक्स’ या गणितीय प्रारूपाच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या, मृत्यू दर त्यासाठीचा कालावधी याचा आधार डॉ. रमण यांनी यासाठी घेतला.

राज्यातील परिस्थिती आटोक्यात येण्यास दोन महिने तर देशातील परिस्थिती आटोक्यात येण्यास अद्याप दोन ते तीन महिने लागू शकतील. दिल्ली आणि गुजरातमधील स्थिती नियंत्रणात येण्यास अडीच आठवडय़ांचा कालावधी लागेल, असेही डॉ. रमण यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आयआयटीच्या अहवालानुसार मुंबईत करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्य़ांपर्यंत वाढला आहे. दोन आठवडय़ांत मुंबईत करोना नियंत्रणात येईल असे या अहावालात आहे. मात्र, योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रुग्ण दुपटीचा कालावधी ५५ दिवसांवर

’ मुंबईमधील करोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५ दिवसांवर पोहोचला असून, रुग्णसंख्या वाढीचा दर १.२६ टक्क्य़ांवर आला आहे. रविवारी दिवसभरात एक हजार ४६ जणांना करोनाची बाधा झाली, तर एक हजार १९३ करोनाबाधित रुग्ण बरे झाले. दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू झाला.

’ पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्य़ांवर पोहोचले आहे. मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या एक लाख एक हजार २२४ वर पोहोचली आहे. ७१ हजार ६८५ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत पाच हजार ७११ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

’ करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील ६९१ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर सहा हजार १६३ इमारती टाळेबंद करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईत दिवसभरात २८८ रुग्ण

नवी मुंबईत शहरात करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही वाढत आहे. रविवारी २८८ नवे रुग्ण वाढले असून रुग्णांची संख्या ११ हजार ४२६ झाली आहे.

शहरात रविवारी ३ जणांचा तर आतापर्यंत ३४३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ७ हजार २१३ रुग्ण करोनातून बरे झाले असून ३ हजार ८७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात प्रतिजन चाचण्याही करण्यात येत आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात १ हजार ६६३ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात रविवारी १ हजार ६६३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ४२७, नवी मुंबई शहरातील २८८, ठाणे शहरातील २५७, उल्हासनगर शहरातील १९४, ठाणे ग्रामीणमधील १६९, मीरा-भाईंदरमधील १३६, बदलापूर शहरातील ७९, अंबरनाथ शहरातील ७८ आणि भिवंडी शहरातील ३५ रुग्णांचा समावेश आहे. तर, रविवारी जिल्ह्य़ात १९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये कल्याणमधील ६, ठाण्यातील ३, नवी मुंबईतील ३, उल्हासनगरमधील ३, अंबरनाथमधील २ तर मीरा भाईंदरमधील आणि ठाणे ग्रामीणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

राज्यात दिवसभरात ९,५१८ रुग्ण

मुंबई  :  राज्यात गेल्या २४ तासांत ९५१८ रुग्णांचे निदान झाले असून, एका दिवसात एवढय़ा रुग्णांचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमध्येच अडीच हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत.

दिवसभरात २५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी मृत्यूदर कमी ठेवण्यात राज्याला यश आले आहे. राज्याचा मृत्यूदर हा ३.८२ टक्के इतका आहे.

वसईत २५४ नवे बाधित

वसई : वसईत शहरी व ग्रामीण भागात रविवारी २५४ नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरी भागात २५२ तर ग्रामीणमध्ये २ रुग्णांची नोंद करण्यात आली. १२१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत रविवारी २५२ नवीन रुग्णांची भर पडली. यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ९ हजार ८२७ एवढी झाली तर रविवारी दिवसभरात १२१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत ६ हजार ४६१ रुग्ण बरे झाले आहेत तर १८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on July 20, 2020 5:18 am

Web Title: coronavirus will be control within two week in mumbai zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-will-be-control-within-two-week-in-mumbai-zws-70-2221409/