मुंबई- मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. मंगळवारी सुरु झालेल्या पावसानं बुधवारीही जोर कायम ठेवला आहे. हवामान खात्याने दोन दिवस सतर्क राहण्याचा इशारा मुंबईकरांना दिला आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात नेहमीप्रमाणे गुडघाभर पाणी तुंबलं आहे. दक्षिण मुंबईत दादर, माटुंगा, वरळी परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. ज्या मार्गावर पाणी साचलं आहे तेथील वाहतूक मुंबई पोलिसांनी बंद केली असून ती वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे. स्वतः मुंबई पोलिसांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबईतल्या दादार टीटी, हिंदमाता परिसर, माहिम जंक्शन, एस.व्ही.रोड अंधेरी, खार सब वे, वांद्रे चांदीवली परिसरात गुडघाभर पाणी साचल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ही थांबवण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ही वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गावर वळवली असून पोलिसांनी या परिसरात न येण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केलंय.
मुंबईमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दादर टी.टी, हिंदमाता जं, माहीम जं, एस.व्ही रोड अंधेरी, खार सबवे, के.एफ.सी बांद्रा आणि चांदिवली जं. या ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून कृपया अत्यावश्यकता असल्यासच पर्यायी मार्गाने प्रवास करावा. घरी रहा सुरक्षित रहा.
— Mumbai Police (@MumbaiPolice) July 15, 2020
मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईसह राज्यभरात हवामान खात्याकडून आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचाः मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस, जाणून घ्या पावसाचे प्रत्येक अपडेट्स
मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सब वे या भागातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अंधेरी सब वे भागात पाणी तुंबण्यास सुरु झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय.
mumbai some area waterlogged Requesting commuters avoid these routes
Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-some-area-waterlogged-requesting-commuters-avoid-these-routes-321677