मुंबई : करोना संसर्गामुळे निर्माण परिस्थिती लक्षात घेऊन पालिकेने गणेश विसर्जनासाठी दक्षिण मुंबईमध्ये पाच ठिकाणी अतिरिक्त कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रॅन्टरोड, ताडदेव, मलबार हिल, मुंबई सेंट्रल आणि गिरगाव येथे कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जाण्याची गरज भासणार नाही.
करोनामुळे निर्माण परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई केली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी पालिकेने गणेश विसर्जनासाठी मुंबईत ३४ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले होते. मात्र ही संख्या अपुरी असून करोनाच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांना घराजवळच गणेश विसर्जन करता यावे यासाठी पालिकेने ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत पाच ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
तलाव कुठे?
’ ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील ऑगस्ट क्रांती मार्गावरील ऑगस्ट क्रांती मैदान
’ ताडदेवच्या साने गुरुजी मार्गावरील वसंतदादा पाटील उद्यान (वाहतूक बेट)
’ मलबार हिल येथील डोंगरशी मार्गावरील एस. एम. जोशी क्रीडांगण
’ डॉ. दादासाहेब भडकम मार्गावरील गिल्डर लेन कर्मचारी वसाहत
’ गिरगावमधील विठ्ठलभाई पटेल रोडवरील आंग्रेवाडीतील मोकळा भूखंड
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 15, 2020 4:14 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/five-artificial-pond-in-south-mumbai-zws-70-2216763/