रायगड : मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम अद्यापही सुरु आहे. मार्गावर मातीचा ढिगारा असल्यामुळे मुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. १३ तास झाले तरी वाहतूक बंदच आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. कोकणात जाणाऱ्या लेनवर वाहनाची रांग दिसत आहे. दरड उपसण्याचे काम सुरु असल्याने वाहने उभी आहे. ही दरड हलवायला किमान दुपारी १२ वाजतील, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले आहे.
काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास धामणदेवी गावाजवळ ही दरड रस्त्यावर आली होती . सुमारे २०० मीटर लांब इतका हा मातीचा ढिगारा आहे. एक जेसीबी आणि एक पोकलेनच्या सहाय्याने राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलीस तसेच एल अँड टी कंपनीचे कर्मचारी माती हटविण्याचे काम करत आहेत. मात्र पावसामुळे तिथं चिखल झाला आहे, त्यामुळे उशीर लागतोय . दरम्यान या मार्गावरील वाहतूक म्हाप्रळ आंबेत तसेच तुळशी खिंड मार्गे वळवण्यात आली आहे.
Source: https://zeenews.india.com/marathi/maharashtra/traffic-jams-on-mumbai-goa-highway-long-queues/526825