मुंबई : मुंबईमध्ये परवापासून सुरु असलेल्या पावसाने आता आणखी जोर धरला आहे. आज देखील मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह नवी मुंबई रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यातच आज साडेबारा वाजता हायटाईड देखील येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली आहे. काल रात्री मुंबईला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मुंबईत साडेबाराच्या सुमारास भरती येण्याची शक्यता आहे. सोबतच मुसळधार पाऊस देखील होणार असल्याने महापालिकेने 24 विभागांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
काल दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबापुरीचा वेग मंदावल्याचं पाहिला मिळालं. हवामान खात्याच्या वतीने तीन दिवसांपूर्वी ऑरेंज अलर्ट जाहिर केला होता तर काल रेड अलर्ट जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार मागील दोन दिवस मुंबईला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल रात्री 8.30च्या तब्बल 132 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेलामुळे तलाव क्षेत्रात केवळ 7 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचं दोन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. परंतु आता शुक्रवार रात्रीपासूनच तलाव क्षेत्रात देखील पावसाने आपलं खातं उघडलं आहे. आज मुंबईत साडे बाराच्या सुमारास समुद्रात हाय टाईड येण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये आज तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतो आहे. यामुळे मुंबई मधील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चेंबूरच्या पोस्टल कॉलनी विभागात रात्रभर झालेल्या पावसाने गुडघाभर पाणी साचले आहे. या कॉलनीमधील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या कॉलनीमधील काही घरात देखील पाणी भरले आहे.
ठाण्यात दिवसभर मुसळधार पावसाने थैमान घातले. सुरुवातीला रिमझिम पडणाऱ्या पावसाने अकराच्या सुमारास जोर धरला. त्यानंतर रात्री पर्यंत संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळ पासून ते रात्रीपर्यंत पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने तब्बल 189 मिमी पावसाची नोंद केली. यावर्षीचा मोसमातील सर्वाधिक पाऊस आजच्या दिवशी झाल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे दिवस भरातील मुसळधार पावसाने ठाण्यात 12 ठिकाणी पाणी साचले आणि तीन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या दुर्घटना झाल्या. यासोबत काही ठिकाणी भिंत देखील पडल्या. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.
शुक्रवारी ठाण्यात 189 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद
हवामान विभागाच्या अंदाजला खरे ठरवत गुरूवारपासून ठाण्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे. शुक्रवारी देखील सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर दुपारी त्याच पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केली. शुक्रवारी ठाण्यात 189 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद केलेली असून आतापर्यंत ठाणे शहरात एकूण 622.33 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाने जोर धरला
पालघर जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून जिल्ह्यात सर्वच भागात चांगला पाऊस सुरू झाला आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय तर जिल्ह्यात समोर कोरोनाचे संकटही आ वासून उभे आहे. सध्या जिल्ह्यात 144 लागू असतानाही काही लोक कायद्याचे उल्लंघन करून पर्यटनासाठी वाहत असलेले धबधबे, धरण, तलाव, झरे, समुद्र किनारे, नद्या, नाले या ठिकाणची वाट धरतात आणि धोका पत्करतात. यामुळे जव्हारमध्ये 5 बळीही गेले. याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी कडक धोरण अवलंबलं असून अशा सर्व पर्यटन स्थळासाठी मनाई आदेश लागू केले आहेत तर कलम 144 नुसार कडक कारवाई करण्याचा आदेश काढला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपले
सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मालवण तालुक्यातील चिंदर येथे घराचे छप्पर, मातीच्या भिंती कोसळल्या, ठिकठिकाणी झाडे पडून घरांचे नुकसान नुकसान झालं. जिल्ह्यात आतापर्यंत 1440 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. नदी नाल्यांना पूर आला असून काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. आचरा हिर्लेवाडी, काझी वाडी येथे घरावर झाडे पडून मोठं नुकसान झाले. किनारपट्टी भागातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. सध्या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे.
Source: https://marathi.abplive.com/news/maharashtra-mumbai-thane-palghar-sindhudurg-navi-mumbai-heavy-rain-update-786489