मुंबई बातम्या

मुंबई शेजारच्या शहरांना कोरोनाचा धोका – Times Now Marathi

मुंबई शेजारच्या शहरांना कोरोनाचा धोका& 

थोडं पण कामाचं

  • मुंबई शेजारच्या शहरांना कोरोनाचा धोका
  • ठाणे जिल्ह्यात ४३ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण
  • मर्यादीत आरोग्य सुविधांमुळे मुंबई जवळच्या शहरांसाठी कोरोना एक गंभीर आव्हान

मुंबईः कोरोना संकट (corona crisis) आता मुंबईतून (Mumbai) शेजारच्या शहरांमध्येही वेगाने पसरत आहे. आधी महाराष्ट्रात आढळलेले जवळपास ७० ते ८० टक्के रुग्ण मुंबईतले होते. आता मुंबई शेजारच्या शहरांमध्येही वेगाने रुग्ण संख्या वाढत आहे.

कोरोना रुग्ण एकाच शहरात एकवटले असताना कल्याण डोंबिवलीसह मुंबई शेजारच्या शहरांच्या पालिकांनी शहरबंदीची मागणी केली होती. ज्यांना अत्यावश्यक कामांसाठी दररोज मुंबई ते शेजारच्या शहरातील घर असा प्रवास करावा लागतो अशांची तात्पुरती मुंबईत राहण्याची व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी कल्याण डोंबिवली मनपाने केली होती. या कामासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेशच्या (Mumbai Metropolitan Region – MMR)   हद्दीतील सर्व पालिकांनी परस्पर समन्वयातून काम करावे अशी मागणी केली जात होती. मात्र राज्य सरकारने ही मागणी फेटाळली. या सरकारी निर्णयाचा परिणाम आता दिसू लागला आहे. 

ठाणे जिल्ह्यात ४३ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ९२ हजार ९९० कोरोनाबाधीत आढळले यापैकी ८२ हजार ७४ रुग्ण मुंबई मनपाच्या हद्दीत आढळले आहेत. शेजारच्या ठाणे जिल्ह्यात ४३ हजार ६३४ कोरोनाबाधीत आढळले तर पालघर जिल्ह्यात ६ हजार ८३७ आणि रायगड जिल्ह्यात ५ हजार २३८ कोरोना रुग्ण आढळले आहे. 

मुंबई महानगर प्रदेशच्या अखत्यारित मुंबई मनपा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचा मर्यादीत भूभाग येतो. आधी कोरोना रुग्ण फक्त मुंबईत दिसत होते. मात्र आता मुंबई शेजारच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शहरांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई अथवा ठाण्यात नियमित जा-ये करणाऱ्यांचा कळत नकळतपणे कोरोनाबाधीत रुग्णांशी संपर्क येऊन त्यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या घटना वाढत आहेत. प्रवासाच्या निमित्ताने कोरोनाची बाधा झालेल्यांमुळे त्यांच्या घरातील सदस्य आणि शेजारपाजारच्यांनाही कोरोना होऊ लागला आहे. प्रामुख्याने मुंबईत असलेले कोरोना संकट संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशांत पसरू लागले आहे.

मर्यादीत आरोग्य सुविधांमुळे मुंबई जवळच्या शहरांसाठी कोरोना एक गंभीर आव्हान

मुंबई आणि ठाणे शहराच्या तुलनेत ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील अनेक मनपा, नगरपालिका, नगर परिषदा यांच्याकडे मर्यादीत आरोग्य सुविधांची व्यवस्था आहे. एखाद्याची तब्येत गंभीर असल्यास त्याला तातडीने मुंबई अथवा ठाण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची पद्धत इथे अनेक वर्षांपासून इथे आहे. अपवादात्मक हॉस्पिटल सोडल्यास जिल्हा पातळीवर मोठ्या हॉस्पिटलची वानवा आहे. त्यामुळे मुंबई शेजारच्या शहरांसाठी कोरोना संकट नवी आव्हाने घेऊन आले आहे. ही परिस्थती हाताळण्यासाठी मुंबई शेजारची शहरे राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून आहेत.

बातमीची भावकी

शहर

कोरोना अॅक्टिव 

(उपचार सुरू असलेले रुग्ण)

कोरोनामुक्त झालेले 

(बरे झालेले)

कोरोनामुळे मृत्यू
नवी मुंबई २९९७ ४११६ २३२
कल्याण-डोंबिवली ४७०४ ३२१५ १३०
मिरा-भाईंदर ९१५ २८१८ १५२
उल्हासनगर १०३९ १२५६ ५२
ठाणे ४६४६ ४९५४ ३५०
भिवंडी ९२९ ११२६ ११८
मुंबई २४,९१२ ५२,३९२ ४७६२

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mmr-facing-corona-crisis/301279