मुंबई बातम्या

मुंबईत ‘या’ भागांमध्ये पुन्हा लॉकडाउन करा; पोलिसांचा महापालिका अधिकाऱ्यांसमोर प्रस्ताव – Loksatta

करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या नियमांचा सातत्याने होत असलेला भंग लक्षात घेता मुंबई पोलिसांनी काही भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र हे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या उत्तर उपनगरांमध्ये पोलिसांत दाखल झालेल्या प्रत्येक चार गुन्ह्यांमागे तीन गुन्हे हे लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणातील होते.

मुंबई पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांची शुक्रवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई पोलिसांनी गोरेगाव ते दहिसरदरम्यान चार भागांमध्ये लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला. महापालिका अधिकाऱ्यांनी मात्र सध्या लॉकडाउन लागू करणं व्यवहार्य नसल्याचं म्हटलं आहे.

दहिसरमध्ये करोनाचा डबलिंग रेट मोठ्या प्रमाणात असल्याचं निदर्शनास आलं आहे. आर-नॉर्थ वॉर्डमध्ये येणाऱ्या या ठिकाणी १६ दिवसांचा डबलिंग रेट असून शुक्रवारी १३१८ करोना रग्णांची नोंद झाली. तर शेजारील आर-सेंट्रल वॉर्ड ज्यामध्ये बोरिवली पश्चिमेचा भागही येतो तिथेही डबलिंग रेटचं प्रमाण मोठं आहे. १८ दिवसांचा डबलिंग रेट असणाऱ्या या वॉर्डमध्ये शुक्रवारी १८८२ रुग्णांची नोंद झाली. शनिवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईचा डबलिंग रेट ३४ दिवस आहे.

पी-नॉर्थ वॉर्डमध्ये शहरातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात जास्त करोना रुग्ण आढळले आहेत. या ठिकाणी जवळपास १० लाख लोकसंख्या असून मालवणी, म्हाडा कंपाऊंट, मार्वे रोड, कुरार विलेज येथे लोक वस्तीस आहेत. मालाड पूर्व येथे गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा पूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आला होता. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पी-नॉर्थ वॉर्डचाही समावेश आहे.

“गेल्या १० दिवसांपासून मालाड पूर्व येथील आप्पापाडा आणि कोकणीपाडा येथे पूर्ण लॉकडाउन असून चांगले परिणाम समोर आले आहेत. करोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. यामुळे आम्ही या दोन ठिकाणी तसंच कांदिवली पूर्व येथील काजूपाडा आणि दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगर येथे लॉकडाउन वाढवण्याचं महापालकेला सुचवलं. यावेळी महापालिका अधिकारी आणि सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) हजर होते. महापालिका अधिकाऱ्यांना आमचं म्हणणं योग्य वाटल्याचं दिसत होतं. आम्ही आता आदेशाची वाट पाहत आहोत,” अशी माहिती आयपीएस अधिकाऱ्याने दिली आहे.

शनिवारी आर-सेंट्रल वॉर्डच्या सहाय्यक मनपा आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितलं की, “मुंबई पोलिसांनी या चार ठिकाणी लॉकडाउन लागू कऱण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी तो व्यवहार्य नाही. माझ्या वॉर्डमध्ये ७० टक्के केसेस या मोठ्या इमारतींमधील असून ३० टक्के रुग्ण झोपडपट्ट्यांमधील आहेत. या आधीच कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर आहेत. मोठ्या इमारतींमधील रुग्णसंख्या जास्त असल्याने आम्ही त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणत आहोत”.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून ते १८ जून दरम्यान शहरात ५९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकट्या उत्तर मुंबईत ४३१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दहिसर, समता नगर, कांदिवली पोलीस स्टेशन येथे सर्वात जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. मास्क न घालणे, मर्यादेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरु ठेवणे, दुचाकीवरुन दोघांनी प्रवास करणे याप्रकरणी हे गुन्हे दाखल आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 21, 2020 3:49 pm

Web Title: coronavirus mumbai police propose lockdown in four areas sgy 87

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-mumbai-police-propose-lockdown-in-four-areas-sgy-87-2193272/