कोरोना&
थोडं पण कामाचं
- उत्तर मुंबई कोरोनाचा नवा हॉटस्पॉट
- दाटीवाटीच्या लोकवस्तीमध्ये कोरोनो रुग्णांचे प्रमाण जास्त
- उत्तर मुंबईतील सर्व कंटेनमेंट झोनमध्ये बाहेरच्यांना प्रवेश करण्यास सक्त मनाई
मुंबईः मुंबईच्या पश्चिम उपनगरात कोरोनाची तीव्रता वाढू लागली आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे उत्तर मुंबई (north mumbai) कोरोनाचा नवा हॉटस्पॉट होत आहे. संकट वाढू लागल्यामुळे उत्तर मुंबईतील काही भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर दुकानांना बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई मनपाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे.
पश्चिम उपनगर म्हणजे दहिसर ते वांद्रे हा भाग. यात उत्तर मुंबई म्हणजे दहिसर ते मालाड पर्यंतचा पट्टा येतो. यातच मालाडच्या पी उत्तर वॉर्डचा मोठा भाग येतो. मालाडमध्ये कोरोनाबाधीत वाढत असताना संपूर्ण उत्तर मुंबईत संकटाची तीव्रता पसरत असल्यामुळे मनपाने गंभीर दखल घेऊन उपाय सुरू केले आहेत.
उत्तर मुंबईतील कोणत्या भागात आढळले किती कोरोना रुग्ण?
आतापर्यंत दहिसरमध्ये १ हजार २७४, बोरिवलीत १ हजार ८२५, कांदिवलीत २ हजार ९०, मालाडमध्ये ३ हजार ३७८ कोरोनाबाधीत आढळले आहेत. उत्तर मुंबईतील वेगवेगळ्या भागांचा रुग्ण दुपटीचा कालावधी वेगवेगळा आहे. मात्र सरासरी दोन ते तीन आठवड्यात उत्तर मुंबईत रुग्ण दुप्पट होत आहेत.
दाटीवाटीच्या लोकवस्तीमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त
झोपडपट्टीच्या परिसरात तसेच जिथे जुन्या बैठया चाळी अथवा १-२ मजल्यांच्या जुन्या छोट्या चाळी आहेत अशा ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत आहे. ज्या भागांमध्ये सार्वजनिक शौचालयांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो त्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. दाटीवाटीच्या लोकवस्तीमुळे धारावी प्रमाणेच उत्तर मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये संसर्ग वेगाने पसरत आहे.
संरक्षण मंत्रालयाच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे उत्तर मुंबईतील पी उत्तर वॉर्ड
मालाडच्या पी उत्तर वॉर्डात संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक महत्त्वाची आस्थापने आहेत. यात सेंट्रल ऑर्डिनन्स डिपार्टमेंटचे (COD) मोठे गोदाम, नौदलाच्या अखत्यारित असलेले आयएनएस हमला (INS Hamla), हेलिपॅड, मढचे एअर फोर्स स्टेशन, मुंबईवर समुद्र अथवा हवेतून हल्ला झाल्यास प्रतिकार करण्यासाठी विशेष व्यवस्था आहे. त्यामुळे या भागातील कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
बातमीची भावकी
उत्तर मुंबईतील सर्व कंटेनमेंट झोनमध्ये बाहेरच्यांना प्रवेश करण्यास सक्त मनाई
उत्तर मुंबईतील सर्व कंटेनमेंट झोनमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मागील काही आठवड्यांपासून हा मनाई हुकूम वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन वाढवला जात आहे. कंटेनमेंट झोनमधील निवडक इमारतींमध्येही मनपाने बाहेरच्या नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून ही खबरदारी घेत असल्याचे मनपाने सांगितले. ज्या भागांमध्ये कोरोना संकटाची तीव्रता जास्त आहे अशा भागांमध्ये तसेच त्यांना खेटून असलेल्या काही परिसरांमध्ये अत्यावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर दुकानांना बंद ठेवले जात आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीत कोरोना रुग्ण सापडल्यास संपूर्ण इमारत सील केली जात आहे. त्या इमारतीमधील सर्व दुकानांनाही बंद केले जात आहे.
Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/north-mumbai-new-corona-hotspot/299234