मुंबई : भारताबाहेर मोठमोठय़ा क्रुझवर काम करणारे आणि टाळेबंदीमुळे सुमारे दोन-अडीच महिने अडकू न पडलेले १८२२ भारतीय मुंबई बंदरात दाखल झाले आहेत. अमेरिका, इंडोनेशिया, ग्रीस अशा विविध देशात अडकलेल्या या भारतीयांना ‘अॅन्थम ऑफ सीज’ आणि ‘सेलिब्रिटी इन्फिनिटी’ या दोन भव्य क्रुझने समुद्रामार्गे भारतात आणण्यात आले. त्यापैकी ९१० जणांना मुंबईत सोडण्यात आले तर ९१२ जण गोव्याकडे रवाना झाले.
‘रॉयल कॅरेबियन’च्या ‘सेलिब्रिटी इन्फिनिटी’ या जहाजाने विविध देशात क्रुझवर काम करणाऱ्या ९१० भारतीयांना १५ जूनला मुंबई बंदरावर आणले गेले. गेले काही महिने टाळेबंदीमुळे ते भारतात परतू शकले नव्हते. या कर्मचाऱ्यांची जहाजांमध्येच करोनाची चाचणी करण्यात आली आणि नकारात्मक अहवाल आलेल्यांना खासगी बससेवेद्वारे घरी रवाना केले. मुंबईत उतरलेल्या ९१० जणांना टप्प्याटप्प्याने घराकडे मार्गस्थ केले जात आहे. ‘आमची मुलगी अमेरिकेत एका भव्य क्रुझवर काम करते. काही महिन्यांचा प्रवास करून ती आज मुंबईत येणार आहे. गेले दोन दिवस त्यांचे जहाज मुंबई बंदरावर आहे. आज संध्याकाळी ती बाहेर
येणार असल्याने आम्ही तिच्या स्वागतासाठी आलो आहोत,’ असे तिथे उपस्थित असलेल्या एका गृहस्थांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 20, 2020 12:17 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/1822-indians-stranded-reached-at-mumbai-port-zws-70-2192245/