करोनामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन शिथील करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. खासगी कार्यालयांनाही १० टक्के किंवा १० कर्मचाऱ्यांसोबत (यापैकी जे जास्त असेल) कामकाज सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कामावर जाण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहेत. पण लोकल सुरु नसल्याने सर्व ताण एसटीवर पडत आहे. दरम्यान लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बंद असलेली लोकल रेल्वे सेवा सुरु कऱण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
एसटी आणि बेस्ट बसेसवर पडणारा ताण लक्षात घेता केंद्राने लोकल रेल्वे सुरू करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे. “रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकार यांच्याशी आम्ही संपर्क साधत आहोत. किमान अत्यावश्यक सेवेत येणारे जे लोक आहेत, मग त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्स, वॉर्डबॉय आहेत सोबतच इतरांना आणण्यासाठी तरी आम्हाला रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्य़ा कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असून त्यांना एसटीने प्रवास करणं कठीण होत लोकल सुरु केल्यास त्यांच्यावरील ताण कमी होईल. त्यामुळे लोकल सेवा सुरू करावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणारा बराचसा कर्मचारी वर्ग कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार येथून मुंबईत कामावर येणारा आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईत कामावर येण्यासाठी ज्यादा एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 1:20 pm
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-lockdown-shivsena-anil-parab-on-mumbai-local-service-sgy-87-2183629/