कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं महापालिकेनं अनेक महत्वाची पावलं उचलली आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईची लाइफलाइन लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकलमध्ये प्रवाशी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळं अधिक पसरण्याची भीती लक्षात घेता मुंबईची लोकल सेवा बंद करण्यात आली. परंतु, ही सेवा बंद केल्यानं लॉकडाउन काळात मुंबई लोकलला तब्बल ३२८ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यातच लोकल केव्हा सुरू होणार याबाबतही स्पष्टता नसल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लॉकडाउन काळात मध्य आणि हार्बर लोकल फेऱ्या बंद असल्याने एकूण १६३.८२ कोटींचा, तर पश्चिम रेल्वेवरील धावणाऱ्या लोकल बंद झाल्याने १६४.२३ कोटींचा फटका सहन करावा लागला आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी नमूद केले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नव्यानं दाखल झालेल्या वातानुकूलित लोकलदेखील यार्डातच आहे. लोकल प्रत्यक्ष धावत नसल्या, तरी यार्डात त्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळं या खर्चाचा भार रेल्वेवर पडत असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा – मुंबई लोकल सुरु करण्याची जितेंद्र आव्हाड यांची मोदी सरकारकडे मागणी
राज्यात हळुहळू लॉकडाऊन शिथील करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानं अनेक क्षेत्रांसमोर सध्या लॉकडाऊन काळातील तोटा कसा भरून काढायचा, असा प्रश्न सतावत आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर लोकलही लॉकडाऊनमुळं पूर्णपणे बंद आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेवरील ३००पेक्षा जास्त गाड्या उभ्या आहेत. यात १२ आणि १५ डब्यांच्या गाड्यांचा समावेश आहे.
हेही वाचा – मुंबई लोकल सुरू करण्याशिवाय पर्यायच नाही- उद्धव ठाकरे
मुंबई लोकल आणखी किती काळ बंद राहणार, हे निश्चित नाही. त्यामुळे तोट्यात आणखी वाढ होणार आहे. प्रवासीभाड्यातून मिळणारे उत्पन्न हे मालवाहतुकीच्या तुलनेत कमी आहे. लोकल सुरू झाल्यानंतर भरपाई देण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात ‘नॉन फेअर रेव्हेन्यू’वर (एनएफआर) भर देण्याचा प्रयत्न असणार आहे. यात लोकलमधील उद्घोषणांपासून ते स्थानकांतील जाहिराती अशा सर्व बाबींचा समावेश असणार असल्याचं समजतं.
हेही वाचा –
कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, फडणवीसांचा गंभीर आरोप
महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमांत पुन्हा बदल, मिळाली एमएमआरमध्ये प्रवासाला मुभा
Source: https://www.mumbailive.com/mr/transport/coronavirus-live-updates-loss-of-rs-328-crore-to-mumbai-local-due-to-lockdown-50775