मुंबई बातम्या

मुंबई पालिकेच्या हद्दीत वादग्रस्त संस्थेला ‘सुपुर्द-ए-खाक’ विधी करण्याचा विशेषाधिकार – Times Now Marathi

मुंबई मनपा& 

थोडं पण कामाचं

  • मुंबई पालिकेच्या हद्दीत वादग्रस्त संस्थेला ‘सुपुर्द-ए-खाक’ विधी करण्याचा विशेषाधिकार
  • देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे सुरू झाली चर्चा
  • आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची चिन्ह

मुंबईः कोरोनामुळे मृत्यू झाला आणि मृतदेहाचे अंत्यसंस्कार (सुपुर्द-ए-खाक) करण्याच्या बाबतीत अडचण निर्माण झाल्यास सामाजिक संस्थांची मदत घेण्याचा धोरणात्मक निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे. मनपाचा हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे सुरू झाली चर्चा

मुंबई मनपाच्या निर्णयाची माहिती मिळाल्याने धक्का बसला असे जाहीर करत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र ट्वीट केले आहे. या पत्रात मुंबई मनपाने मुस्लीम व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अंत्यसंस्कार करण्याच्या बाबतीत अडचण निर्माण झाली तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेची मदत घेणार असल्याचे नमूद आहे. पत्र राज्याच्या विरोधी पक्षनेत्याने ट्वीट केले असल्यामुळे हा विषय गंभीर स्वरुप घेण्याची शक्यता आहे. 

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संस्थेविषयी….

सामाजिक कार्याचा दावा करत स्थापन झालेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेने भारतात सरकारविरोधी कारवायांसाठी आर्थिक आणि मनुष्यबळाच्या स्वरुपात मदत पुरवल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.  दहशतवाद्यांना मदत करणे, दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, भारताच्या संविधानाविषयी समाजात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे अशी कामं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्रालयाने केला आहे. त्यामुळे अशा संस्थेला मुंबई मनपाने मदतीसाठी नियुक्त करणे ही बाब धक्कादायक असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन व्यक्त केले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, फडणवीस यांची मागणी

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुंबई मनपाची सत्ता शिवसेनेकडेच आहे. अशा परिस्थितीत मुंबई मनपाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेची मदत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री म्हणून आपल्याला मान्य आहे का?, अशा स्वरुपाचा प्रश्न फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी, महत्त्वाचे निर्णय घ्यावे; फडणवीस यांची मागणी

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची जबाबदारी घ्यावी, महत्त्वाचे निर्णय घ्यावे अशी मागणी केली होती. आता पुन्हा एकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचा मुद्दा उपस्थित करुन मुख्यमत्र्यांनी थेट लक्ष घालावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

बातमीची भावकी

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची चिन्ह

राज्यात आधीच कोरोना संकट तीव्र होत आहे. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्यांची संख्या ७० हजारांपेक्षा जास्त आहे तर मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्यांची संख्या ४१ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. महाराष्ट्रात चक्रीवादळ धडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही संकटं घोंगावत असताना राज्याच्या राजधानीत, मुंबईमध्ये मनपाने  ‘सुपुर्द-ए-खाक’ विधी करण्याचा (अंत्यसंस्कार) विशेषाधिकार वादग्रस्त संस्थेला दिल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची चिन्ह दिसत आहेत. 

image

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-news-mcgm-coordinate-with-pfi-news-in-marathi/296318