योगेश खरे, झी मीडिया, मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संपूर्ण देशातील कोरोना विषाणूची दहशत लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली. परंतु तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये परप्रांतीयांची त्यांच्या राज्यात परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी देखील हे मजुर सर्व नियम धाब्यावर बसवून कोरोनासारख्या विषाणूला आमंत्रण देताना दिसत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये परप्रांतीय मजुरांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या या शेकडो परप्रांतीय मजुरांनी आपल्या राज्यात परतण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर तोबा गर्दी केली आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवत या मजुरांनी ट्रकच्या माध्यमातून आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. इगतपुरीजवळील सीमेवर वाहनांच्या गर्दीने मुंबईतून परप्रांतीय कामगारांना सोडले की काय असा प्रश्न यामध्ये निर्माण झाला आहे. असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
एवढचं नाही तर काही मजूर थेट रिक्षामार्गे आपल्या गावी निघाले आहेत. यामुळे नाशिकचा मुंबई-आग्रा महामार्ग हा गर्दीने आणि वाहतुकीने ट्रॅफिक जाम होऊ लागला आहे. यामध्ये काही अवजड मालवाहतूक करणारे ट्रक देखील दिसत असल्याने उद्योगांची चाके आता फिरू लागल्याचे स्पष्ट होते.
एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडणाऱ्याची संख्या बऱ्या प्रमाणात असली तरी साखळी मात्र तुडली नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आहे. तर दुसरीकडे मात्र कोरोनावर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडतानाचं चित्र सतत पाहायला मिळत आहे.
Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/workers-crowd-at-mumbai-agra-highway-during-lockdown/519461