करोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. देशात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई आणि पुणे येथील परिस्थिती चिंताजनक आहे. लॉकडाउन होऊन ४० हून अधिक दिवस झाले असून राज्यातील १४ हून अधिक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र आता निर्बंध शिथील केले जात असून जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. करोनानंतरही लोकांना पूर्वकाळजी घ्यावी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे जनजीवन नेहमीप्रमाणे नसेल असं सांगितलं जात आहे. याचा परिणाम गणेशोत्सवावरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गणेशोत्सव आणि महाराष्ट्राचं एक वेगळं नातं आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवादरम्यान खासकरुन मुंबई, पुणे येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पहायला मिळते. पण करोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्त्वाचं असल्याने गणेशोत्सव साजरा होणार की नाही याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे.
अनेकांना गणेश चतुर्थीपर्यंत परिस्थिती सामान्य होईल असा विश्वास वाटत आहे. दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीदेखील गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत साजरा होईल असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे. मात्र यावेळी गणेशोत्सव नेहमीप्रमाणे साजरा न होता अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर यांनी सर्व मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यास सांगितलं आहे. पण दरवर्षीप्रमाणे थाटामाटात न करता अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाईल असंही त्यांनी मंडळांना सांगितलं आहे. “काही वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली होती. त्यानंतरही लोकांना आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणून साधेपणाने ११ दिवस गणेशोत्सव साजरा केला होता,” असं नरेंद्र दहीबावकर यांनी सांगितलं आहे.
“गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांचा तसंच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नाही. संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस तसंच पालिकेवर मोठा ताण आहे. यामुळे यावेळीही गणेश मंडळं आपली मदतीची परंपरा कायम ठेवणार आहेत. लोकांना कमी गर्दी करण्याचं आवाहन करण्यात येणार असून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे,” अशी माहिती नरेंद्र दहीबावकर यांनी दिली आहे.
गणेशोत्सवात मुंबईच्या रस्त्यांवर दिवस-रात्र गर्दी पहायला मिळते. मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्ती हा चर्चेचा तसंच उत्सुकतेचा विषय असतो. मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. नरेंद्र दहीबावकर यांनी मंडळांना साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास सांगितलं असताना दुसरीकडे मंडळांनी मात्र वेट ऍण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. लॉकडाउनमुळे अनेक गणेश मूर्तीकारांनाही आपलं काम अद्याप पूर्ण करता आलेलं नाही. यामुळे आता गणेशोत्सव साजरा होणार की नाही हे पहावं लागेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 5, 2020 9:46 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-lockdown-mumbai-ganeshotsav-celebration-will-be-simple-sgy-87-2150227/