मुंबईतला प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग अयशस्वी& | & फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
- मुंबईतला प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग अयशस्वी
- लीलावती रुग्णालयातील ५२ वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू
- मनपाचा आरोग्य विभाग घेणार परिस्थितीचा आढावा
मुंबईः कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी मुंबईत प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्याचा पहिला प्रयोग अयशस्वी झाला. लीलावती हॉस्पिटलमध्ये ५२ वर्षांच्या रुग्णावर शनिवारी प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. उपचारानंतर रुग्णाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याची तब्येत बिघडली आणि आज (गुरुवारी) त्याने अखेरचा श्वास घेतला.
ताप, सर्दी आणि फुफ्फुसातील संसर्ग ही लक्षणे आढळल्यानंतर ५२ वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णाला लीलावतीमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्येत सावरण्यासाठी रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. प्लाझ्मा थेरपीची परवानगी मिळाल्यानंतर मुंबईत पहिल्या प्रयोगासाठी या रुग्णाची निवड झाली.
मुंबई मनपाच्या मंजुरीनंतर शनिवारी नायर हॉस्पिटलमधून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा घेऊन लीलावतीमधील रुग्णावर प्रयोग करण्यात आला. प्लाझ्मा थेरपी केल्यानंतर रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. तब्येत आणखी बिघडल्यामुळे डॉक्टरांनी इतर जीवरक्षक औषधे देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न करुन बघितला. पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले.
प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे आणखी प्रयोग करायचे की थोडे थांबायचे यावर मुंबई मनपाचा आरोग्य विभाग आणि राज्याचे आरोग्य खाते यांच्या पातळीवर विचार सुरू आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांनी प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी परवानगी दिली असली तरी अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीत निवडक रुग्णांवरच प्रयोग करा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णांना वाचवणे कठीण आहे अशांवर प्लाझ्माचा प्रयोग करुन बघा, सरसकट सर्व रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करू नका, असेही बजावले आहे.
प्लाझ्मा थेरपीत प्लाझ्मातील कोरोनाविरोधी अँटीबॉडीचे (कोरोनारोधक पांढऱ्या पेशी) प्रमाण आणि गुणवत्ता या बाबी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीनुसार अँटीबॉडी गणित वेगवेगळेच असते. त्यामुळे प्लाझ्मा थेरपी करणे सोपे नाही. शिवाय एका व्यक्तीचा प्लाझ्मा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात नवी गुंतागुंत निर्माण करण्याचा धोका आहे. त्यामुळे प्लाझ्माची तसेच ज्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करणार त्याची निवड करताना भरपूर काळजी घेणे आवश्यक आहे. ही खबरदारी न घेता सरसकट प्लाझ्मा थेरपी केल्यास नवे संकट उभे राहण्याचा धोका आहे. प्लाझ्मा थेरपी अपयशी झाल्यास संबंधित रुग्णाच्या फुफ्फुसांना गंभीर संसर्ग होण्याचा तसेच रुग्णाच्या शरीरात कोरोनाची तीव्रता वाढण्याचाही धोका असतो. याच कारणामुळे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग निवडक रुग्णांवरच करावा. हा प्राथमिक अवस्थेतला (ट्रायल) प्रयोग आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
बातमीची भावकी
काय आहे प्लाझ्मा थेरपी?
कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील थोडे रक्त काढून घेऊन त्यातील प्लाझ्मा हा घटक प्रयोगशाळेत वेगळा काढला जातो. हा घटक कोरोनाबाधीत रुग्णाच्या शरीरात सोडतात. या प्लाझ्मा उपचाराला कोरोनाबाधीत रुग्णाकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास तो लवकर बरा होतो तसेच त्याच्या शरीरात कोरोना या आजारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. योग्य प्लाझ्मा नमुना निवडणे आणि त्याला अनुकूल असा रुग्ण निवडणे कठीण आहे. यात चूक झाल्यास रुग्णाच्या जीवावर बेतण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईत प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. मुंबई मनपाचा आरोग्य विभाग परिस्थितीचा आढावा घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाला माहिती देणार.
Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/first-plasma-therapy-patient-died-in-mumbai/291266