करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून लोकांना गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही बेजबाबदार नागरिक घराबाहेर पडत पोलिसांना मनस्ताप देत आहेत. इतकंच नाही तर आपण घराबाहेर पडलो असल्याचे व्हिडीओ शूट करत थेट पोलिसांनाच आवाहन देत आहेत. असाच एक व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. आपण सेलिब्रेटी आहोत, आपल्याला पोलीस मारत नाही असं म्हणत मोठेपणा करणाऱ्या या तरुणाला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली असून जाहीर माफी मागतानाचा त्याचा व्हिडीओही आता व्हायरल होत आहे.
सलीम शेख असं या तरुणाचं नाव आहे. त्याचा टिकटॉकवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामध्ये तो बोलत आहे की, “आम्ही जात होतो तर आम्हाला आमची एक मैत्रीण भेटली. म्हणाली पुढे जाऊ नका पोलीस आहेत. आम्हाला पोलीस मारत नाहीत. सेलिब्रेटी आहोत आम्ही. सेलिब्रेटींनी पोलीस मारत नाहीत”. यावेळी त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता.
यानंतर पोलिसांनी कारवाई करत सलीम शेख आणि त्याच्या मित्रालाही अटक करत धडा शिकवला. पोलिसांनी अटक केल्यानंतर मात्र त्याची भाषा बदलली. अटक केल्यानंतर माफी मागत असतानाचाही त्याचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो सांगत आहे की, “माझं नाव सलीम शेख आहे. मी गोवंडीमधील शिवाजीनगरमध्ये राहतो. मी एक व्हिडीओ केला होता ज्यामध्ये पोलीस सेलिब्रेटींना मारत नाही असं म्हटलं होतं. पण असं नाहीये. सगळ्यांसाठी नियम सारखेच आहेत. मला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मी मास्क न घालता व्हिडीओ शूट केली होता. सर्वात मोठी चूक मी केली. माझ्यावर कारवाई केली जात आहे. मला मुंबई पोलिसांची माफी मागायची आहे. मी आयुष्यात पुन्हा कधी अशी चूक करणार नाही”.
मुंबई पोलिसांनी याआधीही अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर अपलोड करत आव्हान देणाऱ्या अनेकांना अटक केली आहे.
First Published on April 22, 2020 11:24 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-lockdown-mumbai-police-arrest-tiktok-user-for-violating-rule-sgy-87-2138812/