अर्जुन नलवडे – @arjun_nalavade / [email protected]
हात धुऊ वारंवार, मास्क शोभे तोंडी
विनम्रतेने हात जोडू, करू करोनाची कोंडी
टाळू गर्दी, समारंभ, प्रवास बिनकामाचा
पुन्हा एकदा दाखवू बाणा मुंबईकरांचा..
सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत जनजागृती करणाऱ्या अनेक प्रशासकीय विभागांमध्ये मुंबई पोलीस अव्वल आहे. त्याच मुंबई पोलिसांनी मनोरंजनातून समाजप्रबोधन सुरू केलेलं आहे. अख्ख्या जगात करोनाचा विषाणू धुमाकूळ घालत आहे, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मृतांचा आकडाही मोठा होत चालला आहे. यात आकडेवारीच्या तुलनेत देशामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत शासन-प्रशासनाचा प्रत्येक घटक जिवावर उदार होऊन लोकांसाठी सेवा बजावत आहे. या सर्व सेवांमध्ये महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे जनजागृती! मुंबई पोलिसांनी सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात आणि टाळेबंदीच्या परिस्थितीत जनजागृतीसाठी अत्यंत प्रभावीपणे ट्विटरचा वापर केलेला दिसून येत आहे. मनोरंजनात्मक उखाणे, म्हणी, चारोळी, चित्रे, व्यंग्यचित्रे आणि चित्रफितींतून ट्विटरद्वारे समाजजागृती करण्याचा अफलातून प्रयोग मुंबई पोलिसांनी केलेला दिसून येतो. त्यातून जनतेला विनंती, पाठबळ, सूचना देण्याचं काम केलं जात आहे. त्यांच्या या जनजागृतीमध्ये नेमकी मनोरंजक सूचनात्मक माहिती कशी टाकतात, हे पाहणंच मनोरंजक आहे.
कॉमा होता है पंक्च्युएशन
कंजक्शन होता अॅण्ड
घर पे आने के बाद
प्लीज वॉश युअर हॅण्ड
‘टेकिंग ऑन करोना’ या हॅशटॅगखाली तयार केलेल्या चारोळ्यांमधून मुंबई पोलिसांची कमालीची कल्पकता दिसून येत आहे. हिंदूी, इंग्रजी आणि मराठी भाषेचा वापर करत प्रबोधनात्मक विनोदनिर्मिती मुंबई पोलिसांच्या ट्विटवरून दिसून येत आहे. ‘‘हंडय़ावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, करोनाची होईल लागण, सर्व जण राहा घरात’, इतकंच नाही, तर ‘ओ स्त्री कभी मत आना’ या अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या हिंदी सिनेमाच्या नावावरून ‘ओ करोना कभी मत आना’, असं ट्वीट केलंय त्यांनी. करोनासंसर्गामध्ये घ्यायच्या काळजीसंदर्भात मुंबई पोलिसांनी शाहरुख खान, सलमान खान, नागार्जुन, अक्षय कुमार या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या चित्रपटांतील लक्षवेधक चित्रफितींचे छोटे छोटे भाग (करोना जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे) घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न आणखी रंजक केलेला आहे. त्यातून मुंबई पोलिसांची सर्जनशीलता अधोरेखित होतेच होते, त्याहीपलीकडे जाऊन मुंबई पोलीस लोकांच्या आरोग्यासाठी व संरक्षणासाठी सर्व पातळ्यांवर प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत.
अगदी संवेदनशीलतने मुंबई पोलिसांनी आपल्याच काही सहकाऱ्यांशी ‘जर तुम्हाला टाळेबंदीत घरी राहण्याची संधी मिळाली असती तर काय केले असते’, असा प्रश्न विचारला अन् दिवसरात्र २४ तास सेवा देणाऱ्या पोलिसांनी उत्तर दिले की, ‘‘अशी संधी मिळाली तर.. आम्ही पहिल्यांदा घरातील आईवडील, मुले, पती, पत्नी, बहीण-भाऊ यांना वेळ दिला असता. खूप पुस्तके वाचली असती आणि सिनेमे पाहिले असते. घरातील पाळीव प्राण्यांसोबत राहिलो असतो. मस्त एन्जॉय केला असता’’, ही उत्तरं ऐकून करोनाच्या पाश्र्वभूमीवर लोकांनी घरात का बसावे, मिळालेला वेळ किती महत्त्वाचा आहे, घरात बसून काय काय करू शकतो आपण आणि एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत घरात बसणं आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, या सर्व बाबींची लोकांना जाणीव करून देते. गजबजलेली, वेगाने धावणारी मुंबई एकदम शांत झाली आणि सगळीकडे स्मशानशांतता पसरली आहे. ‘‘रिकाम्या रस्त्यांचं शहर अजिबात सुंदर दिसत नाही. ते सुंदर दिसतं तुमच्यामुळे. घरी राहूया, सुरक्षित राहूया. मुंबईला पुन्हा एकदा सुंदर बनवूया’’, अशा आशयाची मुंबईतल्या सूनसान रस्त्यांची चित्रफीत अपलोड करत ट्वीट केलं की, ‘‘स्तब्ध, शांत मुंबई? कल्पनाच करवत नाही. मुंबई म्हणजे सतत उत्साहात धावणारी नगरी.. हे चैतन्य पुन्हा अनुभवण्यासाठी थोडासा संयम बाळगा. आम्हाला खात्री आहे, जेवढे अधिक आपण घरी थांबू तेवढी मुंबई लवकर पूर्वपदावर येईल.’’ अशा ट्वीटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना भावनिक आवाहन केले आहे.
घरी राहणे उपाय मोठा
करोनाचा टळोत धोका
संयम आणि शिस्त राखा
प्रसंग आला मोठा बाका
अशा कल्पकतेतून मुंबई पोलिसांची जनतेप्रति कर्तव्यनिष्ठा दिसून येते. ‘आम्ही घराच्या बाहेर जाणार नाही आणि घरातील सदस्यांनाही गरज नसेल तर बाहेर जाऊ देणार नाही’, हा संदेश लोकांकडून वदवून घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘मै भी मुंबई पोलीस’ हा हॅशटॅग सुरू केला. त्याअतंर्गत त्यांनी आवाहन केलं की..
माझ्या हातात बळ, तुमच्या पाठबळाने येते
पाठीवरची थाप तुमची, मनोबल वाढवून जाते
गरज आहे आता, तुम्ही सोबत राहण्याची
जागृतीच्या मार्गाने स्वत: पोलीस होण्याची..
लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देताना म्हणतात की, ‘‘मी माझ्या आजीला गार्डनमध्ये जाऊ देणार नाही. मी माझ्या वडिलांना वॉकसाठी बाहेर जाऊ देणार नाही. मी माझ्या भावाला खेळण्यासाठी बाहेर पाठविणार नाही. मी माझ्या वडिलांना ऑफिसला जाऊ देणार नाही. मी माझ्या कुटुंबाला घरातून बाहेर जाऊ देणार नाही. मी माझ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेर जाणार नाही. मी माझ्या आईला योगा क्लासमध्ये जाऊ देणार नाही.’’ ट्विटरसारखा वेगळा आणि प्रभावी मार्ग अवलंबून मुंबई पोलिसांनी इतर राज्यांच्या, जिल्ह्य़ांच्या पोलिसांसमोर वेगळा पायंडा पाडून दिला आहे.
तोंडाला मास्क आणि हाताला ग्लोव्हज् लावून पोलिसांच्या हाती त्यांच्या घरातील खरी परिस्थिती सांगून जनतेला भावनिक केले आहे, त्यामागेदेखील जनतेची काळजी हीच भावना प्रामुख्याने अधोरेखित होते. म्हणून ते काही न बोलता हातात फक्त मजकुराची पाटी घेऊन जनतेला सांगताहेत की, ‘‘माझी ३ वर्षांची मुलगी घरी आहे. माझी आई घरी आजारी आहे. माझी बायको माझ्या काळजीत आहे. तरीही आम्ही घरी नाही जाऊ शकत. आम्ही पोलीस आहोत, तुम्हीही आमचे कुटुंब आहात. आम्ही आपले रक्षण करू, आम्ही आपल्याला सुरक्षित ठेवू. म्हणून आमची साथ द्या. स्वत:साठी आणि आपल्या मुंबईसाठी घरी राहा. करोना विषाणूंचा पराभव करण्यासाठी मदत करा. आम्हाला घरी सुरक्षित जाण्यासाठी मदत करा.’’ अशी भावनिक साद घालत त्यांनी मुंबईकरांसाठी चारोळीच्या स्वरूपात ट्वीट केलं आहे की,
हाती दंडुका घेऊन, आज पडलो बाहेर
मुलंबाळं, परिवार सारा घरीच राहिला
सारी मुंबापुरी माझी, आता माझा परिवार
तुम्ही माझेच कुटुंब, रस्ता, माझे घरदार..
ही सगळी मुंबई पोलिसांची कल्पकता आणि लोकांसाठीची काळजी पाहून हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील श्रद्धा कपूर, आलिया भट, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, आयुषमान खुराणा, शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, सई ताम्हणकर अशा बऱ्याच सिनेतारकांनी प्रतिट्वीट करून मुंबई पोलिसांच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे आणि धन्यवाद मानले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 18, 2020 1:03 am
Source: https://www.loksatta.com/lokprabha/coronavirus-pandemic-lockdown-mumbai-police-impressive-use-of-social-media-dd70-2135245/