करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा दुसरा टप्पा १५ एप्रिलनंतर सुरू होत असून त्यात या विषाणूचा प्रादुर्भाव झालेले भाग वगळता इतरत्र किमान ५० टक्के क्षमतेवर कारखाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी औद्योगिक क्षेत्रातून पुढे आली आहे. त्यानुसार मुंबई-पुण्यासारखे करोनाबाधितांची मोठी संख्या असलेले भाग वगळता इतर भागांत कारखाने सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्रात साधारणपणे १४ हजार मोठे उद्योग असून चार लाखांहून अधिक लघू व मध्यम उद्योग आहेत. याशिवाय सूक्ष्म उद्योगांची संख्याही मोठी आहे. या उद्योग क्षेत्रावर सुमारे ८० लाख लोकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार अवलंबून आहे. महाराष्ट्रातील उद्योगांची महिन्याची उलाढाल जवळपास सव्वा लाख कोटी रुपयांच्या आसपास असून त्यातून मोठा महसूल राज्याच्या व कें द्राच्या तिजोरीत जमा होतो. अनेक जिल्ह्य़ांत करोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत किं वा त्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे करोनाच्या दृष्टीने धोकादायक भाग वगळून इतर भागात किमान ५० टक्के क्षमतेवर कारखाने सुरू करण्याबाबत विचार होणे अत्यावश्यक आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठीच्या सोयी-सुविधांची काळजी घेऊन कारखाने सुरू करण्याबाबत विचार झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले.
राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा ९.९ टक्के तर औद्योगिक क्षेत्राचा वाटा ३०.४ टक्के आहे. टाळेबंदीमुळे कृषी-औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठवले आहे, असे महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. औद्योगिक-वाणिज्यिक आस्थापना बंद असल्याने त्यांना वीजबिलात आकारण्यात येणारा स्थिर-मागणी आकार त्या कालावधीसाठी रद्द करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
विशेष पॅकेजची मागणी
महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजतर्फे राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशीही संवाद सुरू आहे. सोमवारी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी राज्यातील उद्योजकांनी ई-चर्चासत्रात संवाद साधला. सूक्ष्म- लघु- मध्यम उद्योगांना अनेक अडचणी भेडसावत आहेत. या उद्योगांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी सूचना या चर्चासत्रात करण्यात आली.
मुंबई-पुणे वगळता करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या इतर भागांत उद्योग सुरू करण्याचा विचार आहे. यासंदर्भात कृतीदलाची मंत्रालयात बैठक घेतली. उद्योग किती प्रमाणात सुरू करावेत, उद्योगांमध्ये कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना के ली आहे. हा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
– सुभाष देसाई, उद्योगमंत्री
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 14, 2020 12:49 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/demand-of-entrepreneurs-to-start-factories-at-half-capacity-abn-97-2131263/