मुंबई बातम्या

मुंबई पोलिसाने लिहिलं खळबळजनक पत्र, वडिलांच्या मृत्यूनंतर व्यवस्थेचा कटू अनुभव – News18 लोकमत

मुंबई पोलिसात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आपल्या व्यवस्थेचा कटू अनुभव आला आहे.

  • Share this:

दापोली, 4 एप्रिल : महाराष्ट्रासह देशभर सध्या कोरोनाचं थैमान सुरू आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. कोरोनामुळे याआधीच देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उभे आहेत.

अशा स्थितीत मुंबई पोलिसात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आपल्या व्यवस्थेचा कटू अनुभव आला आहे. याबाबत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने एक पत्र लिहिलं असून ते सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या आपत्तीच्या काळात धैर्याने मुकाबला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बाबतीत असा प्रकार घडल्याने नागरिकांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे पोलीस कर्मचाऱ्याचे व्हायरल पत्र?

“नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो

मी श्री. समीर जयंत गोठणकर राहणार कामानिमित्त मुंबई स्थानिक गाव पत्ता ( दापोली – उंबर्ले)

मी एक सरकारी कर्मचारी (मुंबई पोलीस) आहे.

विषय : मृत्यूदाखला मिळणेबाबत

आज मी तुमच्यासमोर उंबर्ले गावातील आलेला एक वाईट अनुभव सांगत आहे.

दिनांक २०/०३/२०२० रोजी माझ्या वडिलांचे ( कै. जयंत गोठणकर) यांचे निधन झाले. २१/०३/२०२० रोजी पासून पूर्ण देशात कोरोना या भयानक रोगामुळे संचारबंदी लागली सुट्या बंद झाल्या. रोज मला माझ्या सरकारी नोकरी वरून गैरहजरचे मेसेज यायला सुरुवात झाली. आपण कर्तव्यावर गैरहजर असून तात्काळ हजर व्हा असे रोज मॅसेज येत होते. आज दिनांक ३१/ ०३/२०२० रोजी माझ्या वडिलांचे कार्य होते. मला आपत्कालीन स्तिथी मध्ये मुंबईला जायचे होते म्हणून मी वडिलांचा मृत्यू दाखला घेण्यासाठी उंबर्ले -ओळगाव ग्रामपंचायत मध्ये गेलो ज्या दिवशी वडिलांचा मृत्यू झाला होता त्याच्या दुसऱ्याच दिवसा पासून मी मृत्यू दाखल्याची कल्पना दिली होती.

आज मी ग्रामपंचायत मध्ये गेलो तर वेगळाच अनुभव मला ऐकायला मिळाला. मला ग्रामसेवक मॅडम बोलल्या की डॉक्टरांचा सर्टिफिकेट लागेल म्हणून नियमानुसार ते बरोबर आहे त्यांचं पण जर नैसर्गिक मृत्यू असेल तर त्याची आवश्यकता नसते निदान गावखेड्यामध्ये तरी…..! त्या नंतर मी आपल्या सरकारी हॉस्पिटल मध्ये गेलो. तिथे डॉक्टर आणि तलाठी साहेब सुध्दा उपस्थित होते ते बोलले मी तुमच्या वडिलांना पाहिलेच नाही तर कसे देणार…..? तुम्ही त्यांची ट्रीटमेंट भागवत हॉस्पिटल ला चालू केली होती तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पहा. मी त्यांना विचारले त्यांनी पण सांगितले की ज्यावेळी ते मयत झाले त्यावेळी मी तिथे नव्हतो. गावातील पोलीस पाटील यांना मी सांगितले ते पण बोलले कि मॅडमनी असे वागायला नको हवे होते चुकीचं आहे त्यांचं हे वागणे पण बोलून काय उपयोग यावर एकच मार्ग आहे तो म्हणजे तडफदार व्यक्तिमत्त्व आणि चांगला सुशिक्षित उमेदवारांचा गट पण आपण सर्व मंडळी मुंबईत नोकरीच्या निमित्ताने असतो त्यामुळे सरकारी कर्मचारी आपल्या गावात राहणाऱ्या अशिक्षित लोकांचा गैरफायदा करून घेतात. त्या नंतर मी काही व्यक्तींना घेऊन ग्रामसेवक मॅडम यांना भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी मला जे उत्तर दिले ते खरच खूप भयंकर होते त्यांनी मला सांगितले कि तुमची घरपट्टी भरलेली नाही घरपट्टी भरा मग मृत्यूदाखला देईन म्हणजे यावरून असे स्पष्ट झालं की माझ्या घरच्या लोकांनी घरपट्टी भरली नव्हती म्हणून मृत्यूदाखला दिला नव्हता त्यानंतर त्यांच्या जवळ बोलणे करून शेवटी मृत्यूदाखला त्यांनी मला दिला. आज माझ्यावर एवढी वाईट अवस्था आली ती पण एक सरकारी कर्मचारी असून ते पण आपत्कालीन स्थिती मध्ये आवश्यकता असताना खरंच आडमुठी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण काहीतरी करायला पाहिजे. मी सुद्धा एक सरकारी कर्मचारी आहे पण माझ्या हातून जेवढे चांगले काम करता येते तेवढे करण्याचा प्रयत्न मी करतो कुठे तरी बदल होणे गरजेचे आहे. ज्याच्या घरी मयत झाले आहे आत्ताच तेरावं झालं आणि त्याच्याकडे घरपट्टीचे साडेतीन हजार रुपये लगेच मागायला यांना लाज नाही का वाटत..?

एवढी माणुसकी मेली आहे का आपल्या इथे…?

मला माहीत आहे आपण सर्व युवा पिढी मुंबईमध्ये असतो. आज माझ्यावर जी वेळ आली कदाचित ती वेळ अजून दुसऱ्या कुणावर येऊ शकते. मी एक सरकारी कर्मचारी होतो त्यामुळे मी त्या ग्रामसेवक मॅडमना चांगलेच सुनावले आणि माझे काम पण करून घेतले…..

बदल आवश्यक आहे परंतु बदल करणारे आपण लोकं कधीतरी गावी जातो.

आपल्यातील पण काही लोक गावी येतात तेव्हा त्यांना पण वाईट परिणाम किंवा अनुभव येत असतील पण खर्च असे अनुभव आपण इतरत्रही Share (पाठवले) पाहिजेत कधीतरी त्यांना ते एस. एम. एस कोणाच्या ना कोणाच्या तरी तोंडून ऐकायला भेटतील तेव्हा त्यांना कुठे त्याची लाज वाटेल.”

दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्यानेच आपली व्यथा अशी समाजासमोर मांडल्यानंतर तरी आपल्या व्यवस्थेला पाझर फुटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

First Published: Apr 4, 2020 01:56 PM IST

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai-police-letter-bitter-experience-of-the-system-after-his-fathers-death-mhas-445401.html