संदीप आचार्य
मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयात करोनाबाधित व संशयित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ३० ते ४० टक्के रुग्ण हे मुंबई बाहेरून आले असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. आकडेवारीचा विचार करता मुंबई हा करोनाचा केंद्रबिंदू असल्याने मुंबईतील रुग्णसंख्या वेगाने वाढल्यास व्यवस्था कशी करायची असा प्रश्न पडल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यत पाच महापालिका असताना तेथे करोना रुग्णांची चाचणी, पुरेशा विलगीकरण खाटा तसेच उपचाराची व्यवस्था आजपर्यंत का करण्यात आली नाही, असा सवाल केवळ पालिकेतील डॉक्टरच नव्हे तर राजकीय पक्षाच्या नेत्यांकडूनही उपस्थित केला जात आहे. भिवंडी, कल्याण— डोंबिवली, ठाणे, वसई विरार, नालासोपारा येथून करोना संशयित रुग्ण थेट मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठवले जात आहेत. महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मिळून सुमारे ४१० रुग्ण आज दाखल आहेत. यातील ३० ते ४० टक्के रुग्ण हे मुंबईबाहेरचे असल्याचे एका अधिष्ठात्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी, मुंबईबाहेरील रुग्ण बरेच असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘‘सुरुवातीला कस्तुरबा रुग्णालयात करोना चाचणीची व्यवस्था असल्याने मुंबईबाहेरील रुग्ण येथे येत होते. जोपर्यंत अन्यत्र पुरेशी चाचणी व उपचाराची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत अजूनही काही प्रमाणात मुंबई रुग्ण उपचारासाठी येतील. मुळात पालिका रुग्णालयांवर असलेला विश्वास व साम्थरोगावरील उपचाराची कस्तुरबा रुग्णालयाची त्यातील लक्षात घेऊन येथे रुग्ण येणार हे उघड आहे.’’
ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा रुग्णालयात विलगीकरण खाटांची पुरेशी व्यवस्था नाही, येथे करोना चचणीची कोणती व्यवस्था आहे, असा सवाल मुंबई महापालिकेतील समाजवादी पक्षाचे नेते व भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी केला.
करोनाचा केंद्रबिंदू
मुंबई महापालिका हा करोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. रोजच्या रोज रुग्ण वाढत आहेत. याचा विचार करता मुंबई लगतच्या महापालिका करोनाचा लढा लढण्यासाठी आधीच सक्षम करायला हवे होते असे भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. मुंबईतील गिरण्या तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मोकळ्या जागा, परळचे कामगार विमा रुग्णालय आदी ठिकाणी विलगीकरणासाठी व्यवस्था करता येऊ शकते व तशी सुचनाही आपण मुख्य सचिवांनी केल्याचे शेलार म्हणाले. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात एरवीही उपचार घेणारे ४० टक्यांपेक्षाही जास्त रुग्ण हे मुंबईबाहेरचेच असतात. तथापि करोनासारख्या साथीच्या आजाराशी सामना करण्यासाठी मुंबईलगतच्या अन्य महापालिकांनीही तातडीने सक्षम होणे गरजेचे असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2020 12:45 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/stress-on-mumbai-unbearable-40-of-patients-are-out-abn-97-2123399/