मुंबई बातम्या

मुंबईत दिवसभरात ४३ रुग्ण – Loksatta

करोनाबाधितांची संख्या २७८; शल्यविशारदाला लागण

मुंबईत शुक्रवारी दिवसभरात करोनाचे ४३ नवीन रुग्ण सापडले असून मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा २७८ वर गेला आहे. तर वरळी कोळीवाडय़ातील एका रुग्णाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. शुक्रवारी मुंबईतील आणखी २९ भाग प्रतिबंधित करण्यात आले. मृतांचा आकडा १९ वर गेला असून आतापर्यंत २० जण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत विविध ठिकाणी एक दोन असे रुग्ण शुक्रवारी दिवसभर सापडत असल्यामुळे त्यांच्याशी संबंधित विभाग ताब्यात घेण्याची कारवाई पालिकेतर्फे सुरू होती. धारावीत एक रुग्ण सापडल्यानंतर धारावीतच ३५ वर्षांच्या एका शल्यविशारदाला कोरोना झाल्याचे उघडकीस आल्यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा हादरली आहे. मुंबई सेन्ट्रल येथील खाजगी रुग्णालयात तो काम करीत असल्यामुळे हे रुग्णालय पालिकेने बंद केले आहे.

धारावीच्या बलिगा नगर मध्ये एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली असतानाच गुरुवारी रात्री याच परिसरात एका डॉक्टरला कोरोना झाल्याचे उघडकीस आले. ३५ वर्षीय डॉक्टर मुंबई सेन्ट्रलच्या एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करीत होते. ते रुग्णालय पालिकेत बंद केले. त्याचबरोबर बेस्टच्या एका कर्मचाऱ्यालाही करोना झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे टिळक नगर मध्ये तो जिथे राहत होता ती इमारत ताब्यात घेण्यात आलीच. परंतु वडाळा आगारातील ज्या विभागात तो काम करत होता तो विभाग बंद करण्यात आला आहे.

गिरगावात ऑपेरा हाऊस येथे काही रुग्ण आढळल्यामुळे बहराईवाला क्लीनिकची इमारत प्रतिबंधित करण्यात आली.

आणखी २९ विभाग बंद

मुंबईत शुक्रवारी दिवसभरात नवीन २९ विभाग प्रतिबंधित करण्यात आले. त्यामुळे आता प्रतिबंधित भागांची संख्या एकूण  २४१ झाली आहे. दक्षिण मुंबईत बाबूला टॅंक, बाबूलनाथ, वाळकेश्वर, भेंडीबाजार, कुंभारवाडा , तर गोरेगाव मध्ये मोतीलाल नगर क्रमांक २, गोरेगाव मध्ये पार्थना रुग्णालय, मालवणी मालाड क्रमांक ६ असे नवीन भाग बंद करण्यात आले.

दादरचा भाजीबाजार बंद झाल्याने सोमय्या मैदानावर गर्दी

दादर येथील बाजारपेठेत होणारी मोठी गर्दी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने येथील भाजी बाजार वांद्रे-कु र्ला संकु ल आणि सोमैय्या मैदानात हलवला आहे. मात्र शुक्रवारी सोमैय्या मैदानात भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने, सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजल्याचे पहायला मिळाले. राज्याच्या विविध जिल्ह्यमधून मुंबईकरांसाठी दादर सेनापती बापट मार्गावर रोज पहाटे मोठय़ा प्रमाणात भाजीपाला येतो. त्यामुळे पहाटेपासून येथे सर्वसामान्यांपासून किरकोळ भाजी विक्रेत्यांपर्यंत अनेकांची भाजी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दी न करता परस्परांमध्ये  अंतर राखण्याचा आग्रह धरला जात आहे. परंतु, येथे होणारी गर्दी मुंबईकरांसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने करोनाचे संकट दूर होईपर्यंत हा भाजी बाजार बीकेसी मैदान आणि चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर हलवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारपासून सोमय्या मैदानावर हे भाजी मार्केट सुरू झाले. मात्र पहिल्याच दिवशी याठिकाणी देखील दादरप्रमाणेच मोठी गर्दी पहायला मिळाली.

गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी याठिकाणी काही प्रमाणात कमी गर्दी  झाल्याची माहिती चुनाभट्टी येथील स्थानिक रहिवाशी जितेंद्र जाधव यांनी दिली आहे.

राज्यातील बाधितांची संख्या ४९०

राज्यात शुक्रवारी कोरोनाबाधित ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबई येथील असून १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. नव्या रुग्णांमध्ये पुणे येथील नऊ तर अहमदनगर जिल्ह्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात शुक्रवारी सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यात वसई-विरार, बदलापूर, जळगाव, पुणे येथील प्रत्येकी एकाचा आणि मुंबईतील दोघांचा समावेश आहे. वसई-विरारमधील रुग्ण २९ मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात एका ६२ वर्षांच्या मधुमेही रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण ४९० रुग्णांपैकी ५० जणांना घरी सोडण्यात आले. २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३८ हजार ३९८ जण घरात अलगीकणात असून, ३०७२ जण विविध ठिकाणी विलगीकरणात आहेत.

२४ ठिकाणी निवारा केंद्र

टाळेबंदीमुळे मुंबई शहर आणि उपनगरात अडकून पडलेल्या मजुरांच्या निवाऱ्याची आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. शहरातील सुमारे २४ ठिकाणी सहा हजार मजुर आणि बेघरांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. तर सुमारे ५ हजारहून अधिक गरजुंना दरदिवशी शिजवलेले पुरविले जात आहे. पालिकेकडून उपनगरातील बोरीवली, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, कुर्ला, वांद्रे, मानखुर्द, गोवंडी, विक्रोळी या ठिकाणी तर शहरातील वरळी, प्रभादेवी, भायखळा, मलबार हिल, गिरगाव, माटुंगा, वडाळा आदी भागात गरजुंच्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. यातील सुमारे १४ निवारे सुरू झाले आहेत. तर उर्वरित ठिकाणी राहण्याची व्यवस्था उभारली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली.

बोरिवली-चारकोपमध्ये ५ जण विषाणूबाधित

बोरिवली येथे दोन आणि चारकोप येथे तीन करोनाबाधित रूग्णांची शुक्रवारी नोंद झाली. बोरिवलीतील रूग्णांना भाभा रूग्णालयात तर, चारकोपच्या रूग्णांना सेव्हन हिल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांचीही चाचणी के ली जाणार आहे. रूग्ण राहत असलेल्या इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या असून तेथे र्निजतुकीकरण के ले जात आहे. बोरिवलीच्या जुनी एम. एच. बी. कॉलनी येथील इमारत क्रमांक ५ मधील महिला दादर येथील एका शाळेच्या खानावळीत काम करते. खानावळमालकाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिलेला चाचणी क रून घेण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार महिलेने चाचणी करून घेतली असता गुरूवारी रात्री ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. महिलेच्या पतीलाही करोनाची लागण झाली आहे. सासू, सासरे,  दोन मुलांना शताब्दी रूग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

चेंबूरमध्ये सर्वाधिक ठिकाणे प्रतिबंधित

इतरत्र एका भागात तीन पेक्षा जास्त रुग्ण आढळले की परिसर प्रतिबंधित केला जात असताना मुंबईमध्ये एक रुग्ण आढळला तरी संबंधित इमारत आणि परिसर प्रतिबंधित केला जात आहे. आतापर्यंत मुंबईत २१२ परिसर प्रतिबंधित केले आहेत. यात चेंबूरमधील सर्वाधिक २१ ठिकाणांचा समावेश आहे. प्रतिबंधित केलेल्या भागातील सर्वांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळलेले तब्बल २१२ परिसर  मुंबई महानगर पालिकेने प्रतिबंधित केले आहेत. त्यात चेंबूरमधील सर्वात जास्त २१ ठिकाणे आहेत.  तपासणीसाठी महापालिकेने २९२ पथके तयार केले आहेत. यात पालिकेचे वैद्यकिय अधिकारी,आरोग्य सेविका यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 4, 2020 12:50 am

Web Title: 43 patients a day in mumbai abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/43-patients-a-day-in-mumbai-abn-97-2123408/