मुंबई बातम्या

मुंबई महानगर परिसरात २९ रुग्ण – Loksatta

गेल्या काही दिवसातील सर्वात जास्त रुग्ण सोमवारी आढळले असून मुंबई, मीरा भाईंदर, वसई-विरार, कल्याण परिसरातील मिळून तब्बल २९ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर परिसरातील रुग्णांचा आकडा १७० वर गेला आहे. सोमवारी ८० वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, मध्य मुंबईतील वरळी कोळीवाडा आणि परिसरात गेल्या चार दिवसात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हजारोंच्या संख्येने लोकवस्ती असलेला दाटीवाटीचा हा गावठाण भाग पालिकेने सोमवारी अक्षरश: चहुबाजूने येण्याजण्यासाठी बंद केला. वरळी कोळीवाडय़ातील वाढती रुग्णसंख्या हा समूह संसर्गाचा टप्पा असल्याचे मानले जात आहे.

चार दिवसांपूर्वी येथे एक रुग्ण आढळला. आता येथील रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. आणखी तीन संशयितांचे अहवाल यायचे आहेत. त्यामुळे एरव्ही गजबजलेला हा परिसर रविवारी मध्यरात्रीपासून अक्षरश: यंत्रणांनी ताब्यात घेतला. शहराच्या  इतरही भागात जिथे रूग्णसंख्या जास्त आढळून येत आहे त्या ठिकाणी यंत्रणा तेथील परिसर ताब्यात घेऊन तपासणी करत आहेत. दहिसर येथील आंबावाडी, वाल्मिकी चाळ हा परिसरही पालिके ने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर के ला आहे. या ठिकाणी करोनाचे रूग्ण आढळून आल्याने येथील रहिवाशांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी करोनाचे मुंबईत ३८ आणि मुंबई महानगर परिसरात ९ रुग्ण नव्याने आढळले. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून जेथे रुग्ण आढळतो त्या सभोवती १ लाख घरांचे सर्वेक्षण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. मुलुंड येथील  ८० वर्षांच्या पुरुषाचा शनिवारी मृत्यू झाला होता. संशयास्पद लक्षणे असल्याने त्याची मृत्यूनंतर चाचणी के ली होती. सोमवारी आलेल्या अहवालात त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास होता.

११ जणांच्या संर्सगाचे कारण अस्पष्ट सोमवारी दिवसभरात ४७ रुग्ण मुंबई महानगर परिसरात वाढले आहेत. या रुग्णांपैकी फक्त एक जण हा परदेश प्रवास करून आलेला होता. तर ३५ जण हे आधीच्या रुग्णांचे निकटवर्ती आहेत. तर ११ जणांना कुठून संसर्ग झाला हे माहीत नाही.

म्हणून संख्या वाढली

करोना आजाराच्या तपासण्या लवकरात लवकर आणि जास्त संख्येने व्हाव्यात याकरिता राज्य सरकारने खाजगी प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे. या खाजगी प्रयोगशाळांत गेल्या  २४ ते २८ मार्च या काळात १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्व अहवाल एकत्र करण्यात आले असून त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा आता स्पष्ट होऊ लागला आहे.

कोणत्या विभागात किती रुग्ण

मुंबईतील ज्या भागात करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्या परिसरांचे ‘जीआयएस मॅपिंग’ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलीआहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील ज्या परिसरांमध्ये रुग्णांची संख्या अधिक असेल, त्या परिसरांचे नकाशे व संख्यात्मक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. सर्वच नागरिकांनी घरामध्येच राहणे व आपली काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या परिसरात बाधितांची संख्या अधिक असेल, त्या परिसरातील नागरिकांना तुलनेने अधिक काळजी घेणे, अत्यंतिक गरजेचे आहे. या उद्देशाने याबाबतची माहिती संकेतस्थळाद्वारे सार्वजनिक करण्यात येणार आहे.

अश्विनी भिडे ‘वॉर रूम’च्या समन्वयक

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये ‘करोना वॉर रुम’ सुरू करण्यात आली आहे. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर नुकत्याच रुजू झालेल्या अश्विनी भिडे या ‘वॉर रूम’च्या प्रमुख समन्वयक आहेत. या ‘वॉर रूम’च्या माध्यमातून नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक व व्यवस्थापकीय कार्यवाही दिवसाचे चोवीसही तास व आठवडय़ाचे सातही दिवस सातत्याने करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on March 31, 2020 12:54 am

Web Title: 29 patients in mumbai metropolitan area abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/29-patients-in-mumbai-metropolitan-area-abn-97-2120075/