मुंबई – मुंबईसारख्या मेट्रो शहरांत आता कोरोनाचा फैलाव वेगाने होतोय. यातील ९० टक्के फैलाव हा स्थानिक संसर्गातून झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संचारबंदीनंतरही रस्त्यांवर फिरणाऱ्या मुंबईकरांनी वेळीच हा धोका ओळखून दक्षता पाळायला हवी. मुंबई शहर उपनगरात शनिवारी सात महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा संसर्ग निकट संपर्कातून झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, शनिवारी एकूण २२ कोरोना रुग्णांचे निदान झाले त्यातील १५ मुंबईतील तर सात मुंबईबाहेरील आहेत.
महापालिकेच्या वतीने सेव्हन हिल्स येथे ३५ खाटांचे विलगीकरण केंद्र आणि एच.एन.रिलायन्स रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात येत आहे. ही सुविधा नागरिकांसाठी मोफत आहे. त्याचप्रमाणे, पवई येथील एम.सी.एम.सी.आर येथे २५० खाटांचे विलगीकरण केंद्र तयार कऱण्यात आले आहे. नागरिकांना विविध किराणावस्तू तसेच भाजीपाला इ. सुविधांसाठी ऑनलाइन सेवा वापरण्याची विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
वाशी येथील एक वर्षांच्या मुलगाही कोरोना पाॅझिटिव्ह
वाशी येथील एक वर्षांच्या चिमुलकल्यालाही निकट संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या मुलावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता तरी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सोशल डिस्टन्सिंगची शिस्त पाळावी व ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
‘त्या’ मृत डॉक्टरचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह
मुंबईत २६ मार्च रोजी ८५ वर्षीय रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाला. २६ मार्चच्या रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता, तसेच पेसमेकरही बसविले होते. शिवाय ते त्यांच्या नातवाच्या संपर्कात होते. त्याचा यु.के.प्रवासाचा इतिहास आहे. रुग्णाची कोविड-१९ चाचणी खासगी प्रयोगशाळेत पाॅझिटिव्ह आली, मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने यावर शनिवारी कोरोना रुग्ण असल्याची निश्चिती दिली.
२८ मार्चची आकडेवारी
विलगीकरण केलेले आंतरराष्ट्रीय प्रवासी १८२
बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी आलेले रुग्ण २९४
रुग्णालयात भरती असलेले रुग्ण २०१
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण ९१
मुंबईतील पाॅझिटिव्ह रुग्ण १५
मुंबईबाहेरील पाॅझिटिव्ह रुग्ण ०७
एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण २२
आतापर्यंत झालेल्या मृतांची संख्या ६ (मुंबईतील ४, मुंबईबाहेरील २)
Web Title: CoronaVirus in Mumbai seven month baby found covid 19 positive kkg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
Source: https://m.lokmat.com/mumbai/coronavirus-mumbai-seven-month-baby-found-covid-19-positive-kkg/